पीएमसी बॅंक प्रकरणात दोन ऑडिटर्सनाहीं अटक

मुंबई, दि. 11 – पीएमसी बॅंकेत झालेल्या 4355 कोटी रूपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास शाखेने आज दोन ऑडिटर्स म्हणजे लेखा परिक्षकांनाहीं अटक केली.
जयेश संघानी, केतन लकडावाला अशी या दोन लेखा परिक्षकांची नावे आहेत. हा घोटाळा होत होत त्यावेळी या दोघांनी तेथे लेखा परिक्षणाचे काम केले होते. हा घोटाळा पाठीशी घालण्याचे आणि तो धकवून नेण्याचेच काम या लेखा परिक्षकांनी केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी त्यांना जे प्रश्न विचारले त्याची त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत त्यामुळे त्यांचा कसून तपास करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांचे एचडीआयएल कंपनीशीही साटेलोटे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आत्तापर्यंत एकूण सहा खातेदारांनी आपले प्राण सोडल्याची घटना घडली आहे. हा घोटाळा देशभर गाजला आहे.



