Avishkar Darvhekar : अडीच महिने रुग्णालयात, शरीरावर फोड अन् असह्य वेदना; आविष्कार दारव्हेकरसोबत नेमकं काय घडलं?
Avishkar Darvhekar : एका दुर्मिळ आणि गंभीर आजारामुळे त्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागल्याचं त्याने स्पष्ट केलं.

Avishkar Darvhekar : ‘बिग बॉस मराठी 3’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता आविष्कार दारव्हेकर गेल्या काही महिन्यांपासून मनोरंजनविश्वापासून दूर होता. तो नेमका कुठे गायब झाला होता, याबाबत चाहत्यांमध्ये अनेक चर्चा सुरू होत्या. अखेर आविष्कारने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या अनुपस्थितीमागचं कारण सांगितलं आहे. एका दुर्मिळ आणि गंभीर आजारामुळे त्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागल्याचं त्याने स्पष्ट केलं.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आविष्कार ‘पेम्फिगस व्हल्गॅरिस’ (Pemphigus Vulgaris) या दुर्मिळ त्वचारोगाने त्रस्त होता. हा आजार त्याच्यासाठी अत्यंत वेदनादायी ठरला. या आजारामुळे त्याच्या शरीरावरील त्वचा फाटू लागली होती. शरीरावर फोड येत होते आणि ते फुटल्यानंतर त्यातून रक्तस्रावही होत होता. या संपूर्ण काळात त्याला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या.
आई वडिलांची लाभली साथ
आविष्कारवर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. जवळपास अडीच ते तीन महिने तो रुग्णालयात होता. डॉक्टरांच्या टीमने त्याच्यावर उपचार केले. उपचारांना हळूहळू यश मिळू लागलं आणि त्याची प्रकृती सुधारत गेली. अखेर या गंभीर आजारावर मात करण्यात त्याला यश आलं. या कठीण काळात त्याच्या आई-वडिलांनी त्याला खंबीरपणे साथ दिली.
2004 मध्ये केली अभिनय क्षेत्रात एन्ट्री
आविष्कार दारव्हेकर हा ज्येष्ठ नाटककार आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या प्रसिद्ध नाटकाचे लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचा नातू आहे. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. महाविद्यालयीन जीवनात त्याने अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर 2004 च्या सुमारास त्याने व्यावसायिक अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
टेलिव्हिजनवर सोडली छाप
‘आभाळमाया’, ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘दुर्वा’ आणि ‘तू माझा सांगाती’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्याने विविध भूमिका साकारल्या. मालिकांसोबतच ‘मान सन्मान’, ‘मृत्युपत्र’, ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’, ‘ती आणि इतर’ आणि ‘देवा शपथ खोटं सांगेन खरं सांगणार’ या चित्रपटांमधूनही त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली.
कोणत्या भूमिकेत दिसणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता
अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त अभिनेत्री स्नेहा वाघसोबत झालेल्या विवाहामुळे आणि त्यानंतरच्या घटस्फोटामुळेही आविष्कार चर्चेत आला होता. आता गंभीर आजारावर यशस्वीपणे मात केल्यानंतर तो पुन्हा एकदा कामावर परतला आहे. त्यामुळे आगामी काळात आविष्कार नव्या भूमिका आणि प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार, याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.





