प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पुनावळे येथे भरधाव डंपरने तरुणीला चिरडल्याची घटना ताजी असतानाच बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघातात चिमुकल्यासह महिलेने जीव गमावला. बालेवाडी येथे भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने आजोबा आणि लहान नातू गंभीर जखमी झाले तर सात वर्षीय नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुस येथे ट्रकने धडक दिल्याने ४४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बंडू किसन वावळकर (वय ५४) हे नातू अनुराग बाळू चांदमारे (वय ७, रा.नानाची चाळ, म्हाळुंगे) याला गुरुवारी (दि.२०) दुपारी दोन वाजताच्या सुमारास दुचाकीवरून शाळेतून घरी घेऊन जात होते. दरम्यान बालेवाडीतील म्हाळुंगे पोलिस चौकीजवळ आले असता भरधाव टेम्पोने त्यांना उडवले. यामध्ये बंडू वावळकर व त्यांचा लहान नातू अभिनव चांदमारे (वय ५) गंभीर जखमी झाले. तर दुसरा नातू अनुराग याचा मृत्यू झाला. घटनेनंतर टेम्पोचालक पसार झाला असून बावधन पोलीस तपास करत आहेत.बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सुसगाव स्मशानभूमीजवळ बुधवारी (दि.१९) सकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला. वैशाली सोमनाथ पाखरे (वय ४४, रा.पारखे वस्ती, सुस) या दुचाकीवर जात असताना भरधाव हायवा ट्रकने (एमएच १२ एक्सएम ५५९५) त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक सागर लक्ष्मण भालेराव (वय ३८, रा.सुसगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून बावधन पोलीस तपास करत आहेत.