पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात ट्विस्ट; अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक

Pune Porsche accident । पुण्यातील कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या 15 तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसाद सर्व स्तरातून उमटले आहेत.
मात्र, जनतेने आवाज उठवल्यामुळे जामीनावर सोडलेल्या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील, कोझी व ब्लॅक पबचे मालक आणि कर्मचारी यांची शुक्रवारी (ता.24 ) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यानंतर आता पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. आज पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल पोलीस कोठडीत आहेत. त्यानंतर पोलिसांनी आजोबा सुरेंद्र अगरवालच्याही मुसक्या आवळल्या आहेत. कार ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.





