पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- लोकसभा निवडणुकीच्यावेळी “तुतारी वाजविणारा माणूस’ आणि “तुतारी’ या दोन्ही चिन्हांच्या साधर्म्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्याचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बसला. त्यामुळे या पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. निवडणूक आयोगाने “तुतारी’ हे चिन्ह यादीतून वगळले. त्याच धर्तीवर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानेसुध्दा सहकारी संस्थांच्या निवडणूक चिन्हांच्या यादीतून तुतारी हे चिन्ह वगळले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ च्या नियमांतील तरतुदींनुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांना द्यावयाच्या निवडणूक चिन्हांबाबत विविध परिपत्रके प्राधिकरणाने यापूर्वीच जारी केली आहेत. त्यातील नियमानुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी संबंधित निशाणी, चिन्हे हे सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना देता येणार नाहीत. त्यानुसार यापूर्वी वगळण्यात आलेल्या चिन्हांचा वापर करू नये, असे प्राधिकरणाने दि. २८ नोव्हेंबर २०२२ च्या आदेशित केलेले आहे. तरीसुद्धा प्राधिकरणाने दि. १० ऑक्टोबर व ३१ डिसेंबर २०१४ च्या परिपत्रकाद्वारे सूचित केलेली चिन्हे व निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिलेली चिन्हे यामध्ये काही ठिकाणी साधर्म्य असल्याचे प्राधिकरणाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी प्राधिकरणास चिन्हाच्या नावामध्ये सुधारणा करून काही चिन्हे वगळणे आवश्यक झाल्याने ३१ डिसेंबर २०१४ च्या परिपत्रकासोबतच्या चिन्हातील अनुक्रमांक २५ असलेले “तुतारी’ चिन्ह वगळण्याचे शुद्धीपत्रक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी नुकतेच जारी केले आहे.