अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गॅबार्ड भारत दौऱ्यावर, भगवद् गीतेचा उल्लेख करत म्हणाल्या…

Tulsi Gabbard In Delhi | अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या भेटीदरम्यान भारत-अमेरिका यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा आणि करार होऊ शकतात. नुकतीच त्यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये गॅबार्ड यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. तसेच, सध्या सुरू असलेल्या टॅरिफ वादावर देखील त्यांनी मत मांडले.
तुलसी गॅबार्ड या वार्षिक रायसीना डायलॉग्स कार्यक्रमातही सहभागी झाल्या. भारत दौऱ्यावर त्यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोभाल यांची भेट घेतली. भारत आणि अमेरिकेतील आर्थिक संबंध मजबूत करण्याची ही एक चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, भारतात संधी आहेत आणि भारतीय अधिकारी याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत हे जाणून खूप आनंद झाला. टॅरिफच्याबाबतीतही भारत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे, हे जाणून चांगले वाटले.
त्या पुढे म्हणाल्या की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकेचे व देशातील लोकांचे हित समोर ठेवतात. पंतप्रधान मोदी देखील भारताच्या अर्थव्यवस्थेचे आणि भारतातील लोकांना उपलब्ध असलेल्या संधींचे सर्वोत्तम हित पाहतात यात शंका नाही.
दोन्ही देशांमध्ये टॅरिफबाबत उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे. मी वैयक्तिकरित्या भारतात येऊन उत्साहित असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. तुलसी या भगवान श्रीकृष्णाच्या भक्त आहेत. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, ‘जगाच्या विविध भागांमध्ये युद्धक्षेत्रात सेवा करणे असो किंवा सध्या आपण ज्या आव्हानांना तोंड देत आहोत, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेत दिलेल्या शिकवणी आहेत ज्यावर मी माझ्या सर्वोत्तम आणि वाईट काळात नेहमीच अवलंबून राहते.’
गॅबार्ड यांनी दहशतवादावर देखील भाष्य केले. ‘इस्लामी दहशतवादाने अमेरिका आणि भारताला ग्रासले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यावर मात करण्यासाठी एकत्र काम करत आहेत, असे त्या म्हणाल्या.
तुलसी गॅबार्ड कोण आहेत?
तुलसी गॅबार्ड यांचा जन्म 1981 मध्ये अमेरिकेच्या सामोआ प्रदेशात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माइक गॅबार्ड आणि आईचे नाव कॅरोल गॅबार्ड असे आहे. तुलसी यांच्या आईंनी हवाई येथे स्थायिक झाल्यानंतर हिंदू धर्म स्विकारला. त्यांचे वडील देखील राजकीय पक्षाशी संबंधित होते. तुलसी या 2013 मध्ये हवाई येथून खासदार म्हणून निवडून आल्या.
सध्या त्या अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. भारत दौऱ्यावर त्या रायसीना डायलॉगमध्ये सहभागी झाल्या. रायसीना डायलॉगमध्ये विविध देशांचे परराष्ट्रमंत्री व प्रमुख संस्थेचे अधिकारी सहभागी होतात. यामध्ये विविध आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा होते. 2016 साली याची सुरुवात करण्यात आली होती. याचे आयोजन परराष्ट्र मंत्रालय आणि थिंक टँक ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनद्वारे (ORF) केले जाते.





