नागपूर स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावरून तुकाराम मुंढेंची उचलबांगडी; तीन तासांच्या बैठकीत वादळी चर्चा

नागपूर – नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची नागपूर स्मार्ट सिटी सीईओपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. आता या पदावर महेश मोरोने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
जवळपास तीन तासांपेक्षा जास्त काळ नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाची झंझावाती मीटिंग चालली. या बैठकीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर संदीप जोशी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, एनआयटी चेअरमन उपस्थित होते. ही बैठक चोख पोलीस बंदोबस्तात पार पडली.
तुकाराम मुंढेंवर स्मार्ट सिटी घोटाळ्याच्या मुद्द्यांवर भाजपने अनेक प्रश्न उपस्थित केले. या सर्व मुद्द्यांवर तब्बल तीन तासांपेक्षा जास्त काळ चर्चा झाली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीचे संचालकपद आणि सीईओपद बेकायदा बळकवल्याचे आजच्या बैठकीत सिद्ध झाले, असे नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी बैठकीनंतर सांगितले.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी नागपूर स्मार्ट सिटी सीईओपदाची धुरा अवैधरित्या बळकावल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट केंद्र सरकारकडे तक्रार केली होती. त्यानंतर भाजपने मुंढे यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली होती. तसेच निविदा रद्द करणे, करोनासारख्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना टर्मिनेट करणे, असे निर्णय मुंढे यांनी घेतल्याचा दावाही गडकरींनी पत्रात केला आहे.





