Smart City Initiatives Fail : स्मार्ट सिटीचे पाप महापालिकेच्या माथी; गैरव्यवहाराबाबत तक्रारी
Smart City Initiatives Fail : आजपासून कंपनी बंद : प्रकल्प हस्तांतरणाने पुन्हा फोफावणार ठेकेदारी, टक्केवारी

Smart City Initiatives Fail : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीसाठी १४०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, तरीही अनेक प्रकल्प अपूर्ण तर काही कालबाह्य झाले आहेत. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने प्रकल्पांची दूरवस्था झाली.
आता स्मार्ट सिटीतील हेच भ्रष्टाचाराचे पाप महापालिकेच्या माथी मारले आहे. ३१ मार्चला कंपनी बंद केली असून सर्व प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. हे प्रकल्प पूर्ण करणे, त्याची गुणवत्ता सुधारण्यावर महापालिकेला पुन्हा कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.
केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून स्मार्ट सिटी अभियानाचा गाजावाजा करण्यात आला. त्यात पिंपरी-चिंचवड बेस्ट सिटीचा समावेश झाला नाही. पुण्याचा समावेश असल्याने पिंपरी-चिंचवडला केंद्राने नकारघंटा दिली होती.
नवी मुंबई महापालिका अभियानातून बाहेर पडल्याने पिंपरी-चिंचवडचा त्या जागी समावेश करण्यात आला. स्मार्ट सिटीच्या कामांसाठी ९८० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली.
त्यानंतर कामे वाढवून खर्च तब्बल १ हजार ३७८ कोटी ५६ लाख रुपयावर नेण्यात आला. त्यात केंद्राने ५० टक्के व राज्य शासनाने २५ टक्के निधी दिला. महापालिकेने स्वहिस्सा २५ टक्के तसेच, वाढलेल्या कामांचा आर्थिक भार सोसला आहे.
१७ प्रकल्प अपूर्ण
एरिया बेस डेव्हलपमेंट (एबीडी) साठी भाग निवडण्यासाठी झालेल्या ऑनलाइन मतदानात वाकड आणि पिंपळे सौदागर भागाला सर्वाधिक पसंती मिळाली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी वाकड वगळून पिंपळे गुरवचा समावेश केला. एबीडीमधील पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर या १ हजार ३९० एकर भागांसाठी ५११ कोटी २२ लाख रुपयांची कामे करण्यात आली.
संपूर्ण शहरासाठी पॅन सिटी सोल्युशनमध्ये ८६७ कोटी ३४ लाख रुपयांची कामे झाली. त्यातील १७ प्रकल्प अद्याप अपूर्ण तर पूर्ण झालेल्या कामाचा दर्जा सुमार आहे. त्यातील बहुतांश यंत्रणा व प्रणाली कालबाह्य झाली आहे. अनेक कामांचा नागरिकांना आता काहीच उपयोग नाही.
आता मंगळवार (दि. ३१ मार्च) पासून स्मार्ट सिटी प्रकल्प बंद करण्यात आला आहे. अपूर्ण अवस्थेतील कामे महापालिकेच्या माथी मारण्यात येत आहेत. त्यासाठी पुन्हा महापालिकेच्या संबंधित विभागांकडून वारेमाप खर्च करण्याची शक्यता आहे. परिणामी, स्मार्ट सिटीचे प्रकल्प महापालिकेला डोईजड होण्याची दाट शक्यता आहे. यामधून पुन्हा ठेकेदारी आणि टक्केवारीच्या जुळवणीला सुरूवात होणार आहे.
गैरव्यवहाराबाबत तक्रारी
स्मार्ट सिटी कंपनीने केलेले प्रकल्प व कामे ही राजकीय नेतेमंडळींच्या मर्जीतील ठेकेदार कंपनीने केली. कामांचा दर्जा तसेच, गैरव्यवहाराबाबत थेट पंतप्रधान तसेच, मुख्यमंत्र्यांकडे असंख्य तक्रारी करण्यात आल्या.
मात्र, राजकीय हितसंबंधांमुळे त्या प्रकरणाची कोणतीही चौकशी झाली नाही. कोणत्याही ठेकेदारांवर ठोस कारवाई झालेली नाही. आता स्मार्ट सिटी कंपनी बंद झाल्याने संचालक मंडळ देखील बरखास्त करण्यात येणार आहे.
यंत्रणा कालबाह्य
स्मार्ट सिटीने शहरभरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. जाहिरातीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल, असे सांगत शहरभरात १३ कोटी रुपये खर्च करून ६० व्हेरिवेल मेसेजिंग डिस्प्ले (व्हीएमडी) लावले. तसेच, महापालिकेच्या १२४ शाळेत ई-क्लासरूमअंतर्गत एलईडी टीव्ही लावण्यात आले.
सीसीटीव्ही कॅमेरे, व्हीएमडी, एलईडी टीव्ही यांचा दर्जा सुमार आहे. इलेक्ट्रिकची अनेक साधने, यंत्रणा व प्रणालीची मुदत संपली आहे. ते साहित्य आता कालबाह्य (आऊटडेटेड) झाले आहे. ते साहित्य वापरण्यात आणण्यासाठी पूर्वीइतकाच मोठा खर्च करावा लागणार आहे.
कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरचाही नाही फायदा
तब्बल ४४१ कोटी २३ लाख रुपये खर्च करून निगडीत सिटी इंटिग्रेटेड कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर बांधण्यात आले आहे. संपूर्ण शहरावर २४ तास नजर ठेवण्यासाठी तसेच, महापालिकेची सर्व माहिती त्या ठिकाणी सुरक्षितपणे संग्रहित ठेवण्यात येणार होती.
त्यासाठी शहरात तब्बल ६०० किलोमीटर अंतराचे भूमिगत फायबर केबल नेटवर्किंगचे काम केले गेले. कचरा वाहतूक वाहनांवर लक्ष ठेवणे, स्मार्ट ट्रॉफिक, स्मार्ट पार्किंग, व्हीएमडीवर जाहिराती नियंत्रित करणे तसेच, विविध विभागांवर त्या माध्यमातून देररेख व नियंत्रण ठेवले जाणार होते.
मात्र, सेंटर अद्याप केवळ ४० टक्के कार्यान्वित आहे. ल्या सेंटरचा पिंपरी-चिंचवड पोलिसांना काहीच फायदा होत नसल्याचे नाराजी व्यक्त केली जात आहे. —
तिसऱ्या डोळ्याची नजर कमजोर
महापालिका व स्मार्ट सिटीकडून शहरभरात एकूण ८ हजार ७९० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. ते कॅमेरे निगडी येथील कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरच्या प्रणालीशी जोडले आहेत. त्यातील तब्बल ५ हजार ९६३ कॅमेरे बंद आहेत.
देखभाल, दुरुस्ती, तांत्रिक कारणामुंळे ते कॅमेरे बंद असल्याचे सांगितले जात आहे. कॅमेऱ्यांच्या बॅटऱ्या, केबल व इतर साहित्य चोरीला गेले आहे. पोलिसांना त्या बंद कॅमेऱ्याचा काहीच फायदा होत नाही.
PCMC : पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाई पूर्ण करा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी





