Tukaram Mundhe: नियम पाळणाऱ्यांना एफडीएचे प्रोत्साहन
Tukaram Mundhe:

दि पूना मर्चंट्स चेंबरच्या लाडू-चिवडा उपक्रमाचे तुकाराम मुंढे यांच्या हस्ते उद्घाटन
Tukaram Mundhe: अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) उद्देश व्यापारी, उद्योजकांना त्रास देणे नसून, नियमांचे पालन करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे हा असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी ( दि १ नोव्हेंबर) दि पूना मर्चंट्स चेंबरच्या रास्त दरातील लाडू-चिवडा उपक्रमाच्या उद्घाटनावेळी केले.
गंगाधामजवळील, जयजिनेंद्र प्रतिष्ठानच्या नाजुश्री सभागृहात झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील उपस्थित होते. यावेळी चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशीष दुगड, रायकुमार नहार यांच्यासह चेंबरचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. एफडीएने केलेल्या सूचनांची चेंबरने अंमलबजावणी केल्याबद्दल मुंढे यांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना भोजन द्या Tukaram Mundhe:
दुष्काळी भागातील विद्यार्थी शिक्षण, स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात येतात. आर्थिक अडचणींमुळे त्यांना खर्च भागविणेही कठीण जात आहे. त्यामुळे चेंबर, व्यापारी संघटना, कंपन्यांनी सीएसआर निधीतून जून-जुलैपर्यंत मोफत किंवा सवलतीच्या दरात त्यांना भोजन उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन मुंढे यांनी केले. याला चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठीया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
एफडीए आणि व्यापाऱ्यांमधील समन्वयासाठी समिती स्थापन करावी, अशी विनंती बाठिया यांनी केली. त्यावर एफडीए अधिकाऱ्यांना महिन्याला व्यापारी प्रतिनिधींशी भेटून चर्चा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी अधिकारी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करतील, असे मुंडे यांनी सांगितले.
श्रीनिवास पाटील यांनी ३८ वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे सुरू ठेवल्याबद्दल चेंबरचे कौतुक केले. या उपक्रमाचे ३८ वर्षाचे साक्षीदार, मार्गदर्शक असणारे विठ्ठलशेठ मणियार, जितो इंटरनॅशनल संस्थेचे पुण्याचे अध्यक्ष मनोज छाजेड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी हमाल पंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, आडते असोसिशनचे पदाधिकारी, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य, परिसरातील आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. स्वागत सचिव ईश्वर नहार यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी केले. सहसचिव आशिष दुगड यांनी आभार मानले. सुत्रसंचालन उत्तम बाठिया यांनी केले.
लाडू फोडून चाचणी Tukaram Mundhe:
अध्यक्ष बाठीया म्हणाले, यंदा आम्ही एफडीएच्या नियमांची नेहमी पूर्तता करतो. यावेळी नव्या नियमाची माहिती घेऊन त्याची पूर्तता केली. त्यामुळे आम्ही मुंडे यांना आमंत्रित केले. त्यांनी लाडू फोडून गुणवता तपासली, चिवड्यासाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थाची माहिती, पॅकिंगवरील माहिती वाचून पाहिली. त्याचे समाधान झाल्यावर त्यांनी आमंत्रण स्वीकारले .





