नेवासा येथे तुकाराम महाराज यांच्या बिजोत्सव सोहळ्याची काल्याच्या किर्तनाने सांगता

नेवासा : जगदगुरू संत श्री तुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमन बिजोत्सवाच्या निमित्ताने नेवासा येथील संत श्री तुकाराम महाराज मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळयाचे प्रमुख मार्गदर्शक महंत हभप उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने बिजोत्सव सोहळयाची सांगता करण्यात आली.
जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग जगाच्या सुखासाठी आज ही उपयुक्त असून त्यांचे कार्य पुण्यधर्म वाढीसाठी होते, असे प्रतिपादन हभप उद्धवजी महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलतांना केले. ते पुढे म्हणाले की, जे माणसे लवकर जबाबदारी घेतात, ती जीवनात चांगली कामे करू शकतात. राष्ट्राची व धर्माची सेवा करणे ही आपली जबाबदारी असून ही असलेली सेवा प्रत्येकाला घडली पाहिजे, कारण सेवा हे समाधान देऊन जाते आणि समाधानासारखी दुसरी श्रीमंती कोठे ही नाही ते समाधान परमार्थातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
परमार्थ सेवेचा त्यांना मोठा अभिमान होता, संत तुकाराम महाराजांचे अभंग हे जगाच्या सुखाकरता आज ही उपयुक्त असून त्यांचे कार्य पुण्य धर्म वाढीसाठी होते. आजचे जग हे निरीक्षण व चिंतन करणारे असल्याने शास्त्राला धरूनच त्यांनी समाजाला मार्गदर्शन केले. आज तुकोबारायांच्या वैकुंठगमनाला ३७५ वर्षे झाले तरी त्यांच्या विचारांचे समर्थनच जगात होते. सुखाची पहाट उगवण्यासाठी दुःखाचा सामना हा करावाच लागतो. काम आणि नामाची सांगड घालून सुखाचा अनुभव येण्यासाठी जीवनात देवाला आपलंस करा, असे आवाहन उद्धवजी महाराज मंडलिक यांनी केले.
यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या नामाचा जयघोष करत पुष्पवृष्टीद्वारे वैकुंठगमन बिजोत्सव सोहळा करण्यात आला. बिजोत्सवाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात योगदान देणाऱ्या दात्यांचा तसेच हस्तलिखित गाथा ग्रंथ पूर्ण करणाऱ्या भाविकांचा यावेळी श्रीफळ प्रसाद देऊन गौरव करण्यात आला. यावेळी झालेल्या किर्तन प्रसंगी हभप विश्वनाथबाबा मंडलिक, हभप अंकुश महाराज जगताप यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





