Tukaram Maharaj Dehu Palkh 2026 : तुकोबाराय निघाले विठ्ठल भेटीला…
Tukaram Maharaj Dehu Palkh 2026 : हरिनामाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान

देहूगाव – होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी’ या संत तुकाराम महाराजांनी अभंगातून केलेल्या आवाहनाप्रमाणे टाळ आणि मृदंगाच्या गजरात तुकोबारायांच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी पालखी सोहळ्याचे मंगळवारी पाच वाजता मुख्य मंदिरातील भजनी मंडपातून पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
ज्ञानोबा-तुकाराम, पुंडलिका वरदा हरि विठ्ठल आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजराने देहूनगरी दुमदुमून गेली. हजारो वारकरी, भाविक, दिंडीकरी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक सोहळा पार पडला. प्रस्थान सोहळ्यानिमित्त पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी अकराच्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पादुका परंपरेप्रमाणे मानकरी म्हसलेकर कुटुंबीयांनी इनामदार वाड्यात आणल्या.
तेथे ह.भ.प. दिलीप गोसावी (मोरे) यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पादुका मुख्य मंदिरात आणून प्रदक्षिणा घालण्यात आली आणि भजनी मंडपात विराजमान करण्यात आल्या. दुपारी पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. वेदमंत्रोच्चारात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे महापूजन आणि कलशपूजन करण्यात आले.
मानकरी आजामेळा यादव दिंडीतील ज्येष्ठ वारकरी, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार, युवराज संभाजीराजे छत्रपती आणि संयोगिताराजे छत्रपती, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते वेदमंत्रोच्चारात पादुकांचे महापूजन व कलशपूजन करण्यात आले.
महापूजेनंतर पादुका पालखीत विराजमान करण्यात आल्या. पालखी खांद्यावर घेताच पुंडलिका वरदा हरि विठ्ठलच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. सायंकाळी मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखी देहूतील पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्याकडे रवाना झाली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पालखी इनामदार वाड्यात दाखल झाली. यंदा पावसाचा जोर जास्त असल्यामुळे वारकऱ्यांची संख्या काहीशी कमी होती.
पावसाने घेतली उसंत
रविवारी आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यामुळे पालखी प्रस्थान सोहळ्या दिवशी असाच पाऊस सुरु राहिल्यास काय होणार? अशी भिती व्यक्त होत होती. परंतु पालखी प्रस्थान सोहळ्या दिवशी पावसाने उसंत घेतली.
सर्व विधी, अनुष्ठान पूजन सोहळे निर्विघ्नपणे पार पडले. रिमझिम पावसात हरिनामाचा गजर आसमंती दुमदुमत होता. इंद्रायणी दुथडी भरुन वाहत होती आणि इंद्रायणीच्या काठी वैष्णवांचा उत्साह आणि भक्ती देखील ओसंडून वाहत होती.





