Murlidhar Mohol: महापालिका अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती
Murlidhar Mohol:

राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ; आपत्ती व्यवस्थापनाचा घेतला आढावा
Murlidhar Mohol: लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला लोकांना उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे पुढच्या काही वर्षांचा विचार करून हे प्रश्न सोडवावे लागतील. शिवाय पावसाचा ट्रेंड बदलला असून, गेल्या काही वर्षांत कमी वेळेत अधिक पाऊस होत आहे. त्यादृष्टीने काय तयारी केली, यासह अनेक प्रश्नांची सरबत्ती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांवर केली.
आवश्यक त्या सर्व यंत्रणा पुरवण्यास आम्ही तयार आहोत; परंतु तुम्ही पुणेकरांना कोणतीही अडचण येणार नाही, असे काम करा, असेही मोहोळ म्हणाले.
मंत्री मोहोळ यांनी पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत प्रशासनाची बैठक घेतली. या वेळी महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बिडकर, विरोधी पक्ष नेते निलेश निकम, आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्यासह गटनेते, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध असताना गेल्या तीन वर्षांत शहरातील पाणी साठणाऱ्या ठिकाणांची संख्या किती कमी केली, असाही प्रश्न मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना विचारला. पुणेकरांना समस्या निर्माण होईल, असे एकही ठिकाण शहरात नको. पाणी साचणाऱ्या १२० पैकी ८५ ठिकाणची कामे झाल्याचे प्रशासन सांगत आहे, तर त्या ८५ ठिकाणांपैकी किती ठिकाणी पाणी साचले नाही, असे मोहोळ यांनी विचारले.
सिंहगड रस्त्यावरील आपत्कालीन कक्ष सुरू करण्याचेही निर्देश मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना दिले, तसेच नदीपात्रात फ्लड सेंसरची संख्या वाढवून स्थानिक पातळीवर नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
कमी वेळेत जास्त पाऊस होत असल्याने शहरात खड्डे पडण्याची शक्यता असून, खड्ड्यांची माहिती प्राप्त झाल्यावर लगेचच खड्डे बुजविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा. खड्ड्यांची माहिती कळविण्यासाठी व्हाॅट्स ऍप नंबर उपलब्ध करून देण्याबाबतही मोहोळ यांनी सूचित केले.




