Tukaram Beej 2026 – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज ३७८ वा बीज सोहळा गुरुवारी (दि. ५) तीर्थक्षेत्र देहूत लाखो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकरी, वैष्णव आणि भाविकांच्या उपस्थितीत हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि अभंगवाणीने देहूनगरी अक्षरशः दुमदुमून गेली. यंदाच्या बीज सोहळ्यासाठी गेले दोन दिवस देहूत भाविकांचा ओघ सुरू होता. अनेक वारकरी दिंड्यांसह पायी देहूत दाखल झाले होते, तर मोठ्या संख्येने भाविक खासगी वाहनांनीही येथे पोहोचले. त्यामुळे संपूर्ण देहू नगरी यात्रेचे स्वरूप धारण केल्याचे चित्र पाहायला मिळाले. इंद्रायणी नदी घाट परिसर, मंदिर परिसर, मोकळी मैदाने, शाळा, धर्मशाळा आणि शेतजमिनी येथे सर्वत्र वारकरी मुक्कामी थांबले होते. ठिकठिकाणी भजन, कीर्तन, हरिपाठ आणि सप्ताह सुरू असल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. बीज सोहळ्यानिमित्त पहाटे तीन वाजता काकडा आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर श्रींची महापूजा पार पडली. श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर, श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर तसेच तपोनिधी नारायण महाराज समाधी येथेही महापूजा करण्यात आली. संत तुकाराम महाराज बीज सोहळा, देहू सकाळी सहा वाजता वैकुंठगमन स्थान (गोपाळपुरा) येथे संत तुकाराम महाराजांची महापूजा संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त दिलीप महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे आणि वैभव महाराज मोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी संस्थानचे आजी-माजी पदाधिकारी आणि संत तुकाराम महाराजांचे वंशजही उपस्थित होते. सकाळी दहाच्या सुमारास मुख्य मंदिरातून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी वैकुंठगमन स्थानाकडे रवाना झाली. पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पालखी मार्गावरील व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली. पावणे अकराच्या सुमारास मुख्य मंदिराच्या महाद्वारातून पालखी प्रस्थान झाली आणि मोठ्या भक्तीभावाने भाविकांनी तिचे स्वागत केले. पालखी मार्गावर सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू होता. बीज सोहळ्यानिमित्त देहू नगरी यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना तुळशी, बेलपान, फुले, खेळणी, धार्मिक पुस्तके, छायाचित्रे, कॅलेंडर, तसेच विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली होती. आईस्क्रीम, पेठा, शेव-रेवडी, पेढे तसेच महिलांसाठी विविध आभूषणांची दुकानेही मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून आली.