“महाडीबीटी’ पोर्टलवरून अर्ज केल्यानंतही शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा पुणे – शिष्यवृत्तीसाठी “महाडीबीटी’ पोर्टलवरून अर्ज केलेला आहे, पण तांत्रिक कारणास्तव ही शिष्यवृत्ती मिळू शकली नाही. अशा विद्यार्थ्यांना संस्थांनी शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये. तसेच या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका रोखून ठेवण्यात येऊ नये, अशी तंबी पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभागाने शैक्षणिक संस्थांना दिली आहे. तंत्रशिक्षणच्या अखत्यारित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. तंत्रशिक्षणच्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजना आणि राज्य अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना यासाठी विद्यार्थी अर्ज करतात. ही सर्व प्रक्रिया राज्य शासनाच्या “महाडीबीटी’ पोर्टलवरून विद्यार्थ्यांमार्फत संस्थांकडून शिष्यवृत्ती अर्ज भरले जातात. या शिष्यवृत्तीद्वारे तंत्रशिक्षणच्या विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळतो. दरम्यान, “महाडीबीटी’ पोर्टलवरून शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे त्यांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. तथापि, तांत्रिक कारणास्तव अथवा आर्थिक तरतूद उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव अद्यापपर्यंत ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळू शकली नाही. यात विद्यार्थ्यांचा काहीच दोष नसतानाही संस्थांकडून शुल्क भरण्यासाठी तगादा लावण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याची दखल घेत पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव यांनी संस्थांना परिपत्रक धाडले आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करूनही शुल्क भरण्याच्या तगादाविषयी संस्थांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त होता कामा नये, त्यादृष्टीने संस्थांनी राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे योग्यप्रकार पालन करावे, असेही जाधव यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे. दरम्यान, करोनामुळे पालकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेत असताना अडचणी येत आहेत. अशा संकट परिस्थितीत संस्थांनी शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये, असे पालकांचे म्हणणे आहे.