पुणे – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी घेतली जाते. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परराज्यातही घेतली जाते. मात्र तेथे गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आल्याने एमएचटी-सीइटी परीक्षा राज्याबाहेर गेणार नसल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्यातील एमएचटी-सीईटी परीक्षेतील चुकांसंदर्भात विदानसभा सदस्य अभिजीत वंजारी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना पाटील यांनी परराज्यातील केंद्रात काही मोजक्याच विद्यार्थ्यांना अनपेक्षित गुण मिळाल्याचे आढळल्याचे सांगितले. या केंद्रात विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळत असल्याची बाब संशयास्पद वाटल्याने तेथे सीईटी होणार नाही. यावर्षी एमएचटी-सीईटी परीक्षा २८ सत्रांमध्ये झाली. यातील एकाच केंद्रावरील इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिकेत २१ प्रकारच्या त्रुटी होत्या. त्यामुळे शासनाने लगेच ५ मे २०२५ परीक्षा घेतली आहे. या परीक्षेतील त्रुटीसंदर्भात जबाबदार तीन सदस्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यांचा खुलासा असमाधानकारक वाटल्याने त्यांची सेवा परीक्षेच्या गोपनीय कामाकरिता खंडित केली आहे. या परीक्षेत चुका होऊ नये यासाठी कुलगुरू डॉ. सुनील भिरुड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. प्रश्नसंच तयार करण्यासाठी तज्ज्ञ निवडीची कार्यपद्धती, प्रश्नसंचानुसार प्रश्नपत्रिका तयार करण्याची कार्यपद्धती अशी तिची कार्यकक्षा आहे.