बनावट पावत्या दाखवून टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न? सरकारकडून 200% दंड ठोठावला जाण्याची शक्यता!

नवी दिल्ली : आयकर वाचवण्यासाठी दान किंवा भाड्याच्या बनावट पावत्या वापरणाऱ्यांची आता खैर नाही. फसव्या पावत्यांच्या आधारे कर वजावटीसाठी अर्ज करणाऱ्या करदात्यांवर आयकर विभागाने कडक कारवाई सुरू केली असून, ज्यांनी चुकीचा दावा केला आहे त्यांच्यावर मूळ कराच्या 200% पर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे.
विशेष सावधानतेची गरज – कर सल्लागारांचा इशारा
करतव्यदक्ष नागरिकांना यंदा अधिक सतर्क राहण्याचा सल्ला देत एडवांटएज कन्सल्टिंगचे संस्थापक आणि चार्टर्ड अकाउंटंट चेतन डागा म्हणाले, “सरकार सध्या करदात्यांवर विश्वास ठेवून व्यवहार करते. रिटर्न भरताना कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता नाही आणि प्रोसेसिंगसुद्धा जलद होते. पण याचाच गैरफायदा काही लोक घेत आहेत.”
‘दान’ दाखवून रोखीत परत!
CBDT (केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड) ने अशा अनेक प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे ज्यात करदात्यांनी बँकेद्वारे मोठ्या रकमेचे दान दाखवले आणि नंतर संबंधित संस्थांकडून रोख स्वरूपात पैसे परत घेतले. काही प्रकरणांमध्ये तर दान केल्याचा केवळ देखावा केला गेला, प्रत्यक्षात कोणतेही पैसे दिलेच गेले नाहीत. असे प्रकार लघु राजकीय पक्षांशी संबंधित दानांमध्ये अधिक आढळतात.
भाडे करारातही फसवणूक –
कर वजावटीसाठी अनेकजण अपंजीकृत किंवा बनावट भाडे करार दाखवतात किंवा भाडे अतिशयोक्तीपूर्ण रकमेने दाखवले जाते. असे प्रकार याआधी दुर्लक्षित होत असले तरी आता तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचे अचूक विश्लेषण होऊ लागले आहे.
AI आणि डेटा अॅनालिटिक्समुळे आता पकड सोपी
रस्तोगी चेंबर्सचे कर सल्लागार अभिषेक रस्तोगी म्हणाले, “आयकर विभागाकडे आता अत्याधुनिक टूल्स उपलब्ध आहेत जे बँका, नियोक्ता आणि इतर स्त्रोतांकडून डेटा मिळवतात. AI आणि अॅनालिटिक्सच्या मदतीने यामध्ये तफावत लगेच लक्षात येते. करदात्याच्या उत्पन्नाशी न जुळणाऱ्या सवलतींवर लगेच प्रश्नचिन्ह निर्माण होते.”
40,000 करदात्यांनी घेतली सुधारणा; 1,045 कोटी परत
CBDT च्या माहितीनुसार, गेल्या 4 महिन्यांत तब्बल 40,000 करदात्यांनी आपले रिटर्न सुधारले असून 1,045 कोटी रुपयांचे फसवे दावे मागे घेण्यात आले आहेत.
15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ – पण सावध राहा!
यावर्षी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र त्याआधीच जर बनावट पावत्यांच्या आधारे टॅक्स वाचवण्याचा विचार करत असाल, तर सावध व्हा – कारण आता प्रत्येक दावा अधिक काटेकोरपणे तपासला जात आहे!





