Rahul Salunkhe : संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखेंवर गंभीर गुन्हा; महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू
Rahul Salunkhe : त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्याविरुद्ध लैंगिक शोषण, फसवणूक, मारहाण आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Rahul Salunkhe : त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल साळुंखे यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात लैंगिक शोषण, फसवणूक, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही अटक न झाल्याने संबंधित महिलेने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. तिच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, राहुल साळुंखे यांनी पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी विवाह करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाच्या आधारे गेल्या तीन वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. लग्नाबाबत तिने विचारणा केल्यानंतर साळुंखे यांनी विवाहास नकार दिला. तसेच मारहाण करून खासगी आणि आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच, स्वतःसह मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप महिलेने केला आहे. या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिसांनी साळुंखे यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीला अटक झाली नसल्याने संबंधित महिला नैराश्यात गेली आणि तिने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षाविरुद्ध गंभीर आरोप आणि गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. आरोपी साळुंखे फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत. दरम्यान, या प्रकारानंतर संस्थान विश्वस्तांनी तातडीची बैठक बोलावली असून साळुंखे यांच्या हकालपट्टीचे आणि नवीन अध्यक्ष निवडीचे निर्णय होण्याची शक्यता आहे.





