Pune District : दौंडमध्ये रंगला वैचारिक विचारातून सत्यशोधक विवाह

वाल्हे : पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे येथे रहिवासी असलेल्या श्रीमती विमल व स्व. जयवंत साधू जाधव यांचा मुलगा विजय व दौंड तालुक्यातील गोपाळवाडी येथील रहिवासी श्रीमती अंजना व स्व. महादेव रामचंद्र झुरंगे यांची कन्या त्रिवेणी या उच्चशिक्षित कुटुंबाने एका विचाराने लग्नातील अनावश्यक खर्च टाळून महात्मा फुले यांना प्रेरित असलेल्या सत्यशोधक पद्धतीने विवाहात बद्ध झाले.
गोपाळवाडी (ता. दौंड) गावामध्ये युनिटी ऑफ मूलनिवासी आणि सत्यशोधक धर्म महासभेच्या वतीने जाधव आणि झुरुंगे यांनी वैचारिक परिवर्तनातून,महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीप्रमाणे सत्यशोधक विवाह केला. विवाहाचे सुरुवातीस बहुजन महापुरुष महानायकांना अभिवादन करून या विवाहाच्या मुख्य कार्यास सुरुवात करण्यात आली.महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून, बळीराजाचे जनकल्याणकारी राज्य नव्याने आणण्यासाठी शपथ घेतली होती.
नवरदेवाच्या माध्यमातून राष्ट्र रक्षणाकरता सर्व समाज बांधवांच्या समोर बलिदान दिलेल्या वीर जवानांना अभिवादन करून सत्यशोधक विवाह मंचावरती नवरदेवाने प्रवेश केला आणि क्रांतीची मशाल पेटवून उपस्थित समाज बांधवांच्या समोर हा सत्यशोधक विवाह केला. सत्यशोधक धर्म महासभा आणि युनिटी ऑफ मूलनिवासीचे डॉक्टर दत्तात्रय जगताप यांनी हा विवाह संपन्न करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. सत्यशोधक धर्म महासभेचे कार्यकर्ते राणी बनकर, निलेश बनकर, जनार्दन भागवत, रामचंद्र भागवत, मनोहर कोकरे यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.
वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी काही नामांकित मंडळी तसेच बामसेफ तथा युनिटी ऑफ मूलनिवासीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काळे आणि मुलाचे मामा गणेश भुजबळ व मुलीचे मामा शंकर होले यांनी महापुरुषांनी दिलेल्या तत्त्वांवरती चालावे व समाजाचा उद्धार करावा असे देखील म्हणले. संबंधित विवाहामध्ये वधू-वरांच्या माध्यमातून भारतीय संविधानाच्या उद्दिशेकेचे वाचन करत उपस्थितांना शपथ देण्यात आली आणि संबंधित सत्यशोधक विवाह संपन्न झाल्यानंतर विवाहाचे प्रमाणपत्र समाजासमोर वधू -वरांना देण्यात आले.





