ट्रंपचा इशारा: भारतावर 250% टॅरिफ? रशियासोबतचा तेल व्यापार थांबवा नाहीतर परिणामांना सामोरे जा!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर पुन्हा तीव्र शब्दांत टीका करत रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यास भारताकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ (आयात शुल्क) मध्ये लक्षणीय वाढ करण्याची धमकी दिली आहे. मंगळवारी अमेरिकन न्यूज चॅनेल सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ट्रंप यांनी भारताच्या सध्याच्या टॅरिफ धोरणांवर नाराजी व्यक्त करत रशियाकडून तेल खरेदीमुळे युक्रेन युद्धाला चालना मिळत असल्याचा आरोप केला.
ट्रंप म्हणाले, “भारत हा आमचा चांगला व्यापारी भागीदार नाही. ते आमच्यासोबत मोठ्या प्रमाणात व्यापार करतात, पण आम्ही त्यांच्याशी तितका व्यापार करत नाही. आम्ही २५ टक्के टॅरिफ निश्चित केला होता, पण पुढील २४ तासांत मी तो लक्षणीय वाढवणार आहे, कारण ते रशियाकडून तेल खरेदी करत आहेत.” मात्र, नवीन टॅरिफ किती असेल, याबाबत त्यांनी स्पष्टता दिली नाही. याशिवाय, फार्मास्युटिकल्सवर प्रारंभी कमी टॅरिफ लावण्याची आणि नंतर तो वाढवण्याची त्यांची योजना आहे.
फार्मा आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफचे संकेत –
ट्रंप यांनी पुढील आठवड्यात फार्मास्युटिकल्स आणि सेमीकंडक्टर आयातावर टॅरिफ जाहीर होण्याची शक्यता वर्तवली. ते म्हणाले, “आम्ही फार्मास्युटिकल्सवर सुरुवातीला कमी टॅरिफ लावू, पण पुढील एक ते दीड वर्षांत तो १५० टक्क्यांपर्यंत आणि नंतर २५० टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. आम्हाला सर्व औषधे आमच्या देशातच बनवायची आहेत.” येत्या काळात अनेक आयात वस्तूंवर टॅरिफ १५० ते २५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात, असे संकेत त्यांनी दिले, परंतु यासाठी स्पष्ट वेळापत्रक किंवा तपशील दिला नाही.
रशियाविरोधात आर्थिक दबावाची रणनीती –
ट्रंप यांनी रशियाविरोधातील आर्थिक दबावाच्या रणनीतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, “जर जागतिक तेलाच्या किमती प्रति बॅरल १० डॉलर किंवा त्यापेक्षा कमी झाल्या, तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमधील सैन्य कारवाया थांबवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, कारण त्यांची अर्थव्यवस्था आधीच खराब स्थितीत आहे.” रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर टॅरिफ लादून ट्रंप रशियावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
अमेरिकन बँकांवरही आरोप –
या मुलाखतीत ट्रंप यांनी अमेरिकन बँकांवरही टीका केली. बँक ऑफ अमेरिका आणि जेपी मॉर्गनसारख्या मोठ्या बँकांवर त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध भेदभाव करण्याचा आरोप केला. “या बँका माझ्या आणि माझ्या समर्थकांविरुद्ध भेदभाव करतात. त्या कंझर्व्हेटिव्हपेक्षा ट्रंप समर्थकांना अधिक लक्ष्य करतात,” असे ट्रंप म्हणाले. या विधानामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारत-अमेरिका व्यापारात तणाव –
ट्रंप यांच्या या धमकीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांवर ताण येण्याची शक्यता आहे. भारताने यापूर्वी रशियाकडून तेल खरेदी हे आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे सांगितले आहे. येत्या काळात भारत या धमकीला कसे सामोरे जाईल आणि व्यापारी धोरणात काय बदल करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





