ट्रम्पच्या धमक्यांचा भारतावर काहीही परिणाम नाही, डोभालनंतर आता जयशंकर जाणार रशियाला

नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर पुढील आठवड्यात रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गेल्या आठवड्यात रशियाला भेट दिली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% बेस आणि २५% अतिरिक्त शुल्क लादले आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. याशिवाय, भारताने पाकिस्तानबरोबरच्या सीजफायरचे श्रेय ट्रम्प यांना न दिल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ट्रम्प यांच्या धमक्यांना न जुमानता भारताने स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय हित सर्वोच्च आहे आणि रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी सुरूच राहील.
जयशंकर यांचा रशिया दौरा –
डोभाल यांच्यानंतर आता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर २१ ऑगस्ट रोजी रशियाला भेट देणार आहेत. ट्रम्प यांच्याशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान जयशंकर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव यांच्याशी भेटणार असून, दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ करण्यावर चर्चा होईल. याशिवाय, जयशंकर मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचीही भेट घेणार आहेत. या दौऱ्याचा उद्देश भारत-रशिया यांच्यातील आधीच मजबूत असलेल्या संबंधांना आणखी बळकटी देणे हा आहे.
ट्रम्प यांना प्रत्युत्तर-
गेल्या आठवड्यात डोभाल यांनी रशियाला भेट दिली, तर आता जयशंकर रशियाला जाणार आहेत. याशिवाय, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यंदा भारत दौऱ्यावर येणार असून, पंतप्रधान मोदी यांच्याशी भेटणार आहेत. या दौऱ्याच्या तारखेची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. ट्रम्प यांच्या धमक्यांनंतर भारताच्या दोन महत्त्वाच्या व्यक्तींचा रशिया दौरा आणि पुतिन यांचे भारतात लवकरच येणे, हे ट्रम्प यांना स्पष्ट संदेश आहे की, त्यांच्या धमक्यांचा भारत-रशिया संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही.





