“ट्रम्पच्या करवाढीमुळे अमेरिकेलाच त्रास होईल! भारतावर मर्यादित परिणाम” – रघुराम राजन

नवी दिल्ली – रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अमेरिकेच्या वाढीव आयात शुल्काचा परिणाम अमेरिकेवरच होणार असल्याचे सांगितले. अमेरीकेने स्वतःच्या विरोधात गोल केल्यासारखा हा प्रकार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र भारतावर या घटनाक्रमाचा फारसा परिणाम होणार नाही असा दावा राजन यांनी केला आहे.
अमेरिकेने 60 देशांविरोधात 10 ते 50 टक्के आयात शुल्क लावण्याची एकतर्फी घोषणा केली आहे. अमेरिकेला लघु पल्ल्यात आणि दीर्घ पल्ल्यातही या निर्णयाची किंमत मोजावी लागेल. कारण अमेरिकेत वस्तू महागतील आणि त्यामुळे मागणी कमी होईल.
याउलट भारतासारख्या देशांमध्ये सकारात्मक बदल होतील. अमेरिकेतच वस्तूची निर्मिती व्हावी असा डोनाल्ड ट्रम्प यांचा आग्रह आहे. मात्र एकूण परिस्थिती पाहता नजीकच्या भविष्यात असे काही होण्याची शक्यता नाही. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था अधिक कमकुवत होईल.
दरम्यान भारताने आयात शुल्क कमी करण्याची गरज आहे का असे विचारले असता राजन यांनी सांगितले की, निश्चितच भारताने या शक्यतेवर विचार करावा. त्यामुळे भारतातील स्पर्धात्मकता वाढेल आणि अशा प्रकारच्या निर्णयाचा भारतावर आगामी काळामध्ये आणखी कमी परिणाम होईल.
भारताने चीनबरोबरच इतर आशियाई देशाबरोबर व्यापारी संबंध वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे एक तर वाहतुकीचा खर्च कमी होईल. त्याचबरोबर अशा प्रकारच्या अमेरिकेच्या बचावात्मक धोरणापासून भारताला संरक्षण मिळू शकेल.





