ट्रम्प- झेलेन्स्की वादावरून अमेरिकेत राजकीय दुही ! रिपलिब्कन नेत्यांकडून ट्रम्प यांचे समर्थन, तर डेमोक्रॅटस्चा हल्लाबोल

Trump-Zelensky – ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील जोरदार वादविवादानंतर या विषयाचे चांगलेच पडसाद उमटले असून सर्व बाजूंनी प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला आहे. एकीकडे काही जण या वादविवादासाठी ट्रम्प आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष वान्स यांच्यावर टीका करत आहेत, तर दुसरीकडे काही जण याला झेलेन्स्की आणि अमेरिकेचा अपमान म्हणत आहेत. तथापि, या चर्चेमुळे गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युध्दाच्या मुद्द्यावर अमेरिकेत असलेले राजकीय मतभेदही आज उघड झाले आहेत.
ट्रम्प आणि वान्स यांनी जागतिक माध्यमांवर झेलेन्स्की यांच्यावर टीका करून तेच चुकीचे काम केले आहे जे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी केले होते असे अमेरिकेतील डेमोक्रॅटिक गटाने म्हटले आहे. तर रिपब्लिकन नेत्यांनी म्हटले की रशियन हल्ल्यानंतर अमेरिकेने युक्रेनला जी मदत केली त्याबाबत झेलेन्स्की यांच्यात कृतज्ञतेचा अभाव दिसून आला. त्यामुळे अमेरिकेच्या नेत्यांनी जे केले ते योग्यच केले.
डेमोक्रॅटिक नेत्यांनी काय म्हटले?
आज आपण ओव्हल ऑफिसमध्ये जे पाहिले ते लज्जास्पद होते असे नमूद करून मेरीलँडचे सिनेटर ख्रिस व्हॅन हॉलेन म्हणाले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपाध्यक्ष वान्स यांनी झेलेन्स्की यांच्यावर टीका केली आणि हा प्रकार अमेरिकेसाठी लाजिरवाणा असून आमच्या मित्राचा विश्वासघात आहे. या काळात ज्या प्रकारची खोटी माहिती पसरवली गेली त्याची खुद्द पुतीन यांनाही लाज वाटेल.
तर ट्रम्प आणि वान्स पुतिन यांचेच घाणेरडे काम करत आहेत, असे सिनेटचे अल्पसंख्याक नेते चक शूमर म्हणाले. सिनेटमधील डेमोक्रॅट्स स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी लढणे कधीही थांबवणार नाही असेही त्यांनी सांगितले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बेन रोड्स म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प जगासमोर अमेरिकेला एका अतिउजव्या, हुकूमशाही, मूल्यहीन देशात रूपांतरित करत आहेत.
दरम्यान, युक्रेन कॉकसचे सह-अध्यक्ष डिक डर्बिन म्हणाले, आम्ही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इतिहास पुन्हा लिहिण्याची आणि दशकांपासूनचा द्विपक्षीय पाठिंबा रद्द करण्याची परवानगी देऊ शकत नाही. मी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची माफी मागतो आणि माझ्या युक्रेनियन मित्राला माझा पाठिंबा पुन्हा जाहीर करतो.
रिपब्लिकन नेत्यांची काय भूमिका?
दक्षिण कॅरोलिनाच्या सिनेटर लिंडसे ग्राहम म्हणाल्या, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एकतर मूलभूतपणे बदलले पाहिजे किंवा त्यांना पद सोडावे लागेल. आज जे घडले ते पाहिल्यानंतर बहुतेक अमेरिकन लोकांना झेलेन्स्कींसोबत भागीदार राहायला आवडेल यावर माझा विश्वास बसत नाही.
आज, झेलेन्स्की व्हाइट हाउसमधून शांतता करार घेऊन परतू शकले असते ज्यामुळे वर्षानुवर्षे चाललेला हा संघर्ष संपला असता, असे टेनेसीमधील काँग्रेसवुमन डायना हर्षबर्गर म्हणाल्या. पण त्यांनी आमच्या देशाचा आणि आमच्या राष्ट्रपतींचा अपमान करण्याला प्राधान्य दिले. आपल्या देशाच्या सन्मानासाठी उभे राहिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपराष्ट्रपती वान्स यांचे आभार.
ओव्हल ऑफिसमध्ये झेलेन्स्कींचे वर्तन हास्यास्पद होते, असे फ्लोरिडाचे काँग्रेसमन ग्रेग स्टीब म्हणाले. अमेरिकेने युक्रेनच्या संरक्षणासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत आणि या मदतीबद्दल अमेरिकन जनतेचे अशा प्रकारे आभार मानले गेले आहेत. हे युद्ध संपवण्याची वेळ आली आहे. अमेरिका फर्स्ट कृतीत आहे, असे टेक्सासचे काँग्रेसमन ब्रँडन गिल म्हणाले. आपल्या लोकांना आणि शांततेला प्राधान्य दिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी वान्स यांचे त्यांनी आभार मानले.





