Donald Trump : नाटोने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी; डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन

बास्किंग रिज : जर नाटो सदस्य देशांनी रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले आणि रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल चीनवर ५० ते १०० टक्के आयात शुल्क लावले, तर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबू शकते, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी हे आवाहन केले आहे.
हे युद्ध जिंकावे यासाठीची नाटोची कटिबद्धता १०० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. नाटोच्या काही सदस्य देशांनीच रशियाकडून तेल खरेदी करावी, हे धक्कादायक आहे. यामुळे नाटोकडून रशियाबरोबर केल्या जात असलेल्या वाटाघाटींची क्षमता कमकुवत होते आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
नाटोमध्ये २३ देश सदस्य आहेत. नाटोचा सदस्य असलेला तुर्कीये हा रशियाच्या तेलाचा चीननंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. याशिवाय नाटोचे सदस्य असलेल्या हंगेरी आणि स्लोवाकियाकडूनही रशियाकडून तेलाची खरेदी होत असते, असे सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी ऍन्ड क्लीन एअरने म्हटले आहे.
पोलंडच्या हद्दीत रशियाची ड्रोन घुसल्यानंतर नाटो सदस्य देश आक्रमक झाले आहेत. पोलंडने आपल्या हवाई हद्दीत घुसलेली रशियाची १७ ड्रोन पाडली आहेत. आता पोलंडकडून रशियावर अधिक कठोर निर्बंध घालण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभुमीवर नाटोने रशियाचे तेल खरेदी करण्यावर बंदी घालावी आणि चीनवर आयात शुल्क लावल्यास हे घातक युद्ध समाप्त होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.





