Iran US Tensions: जगातील सर्वात मोठी लष्करी शक्ती असलेल्या अमेरिकेसमोर एक मोठा प्रश्न उभा ठाकला आहे, इराणविरुद्धच्या युद्धात विजय का मिळत नाही? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षण तज्ज्ञांनी ही लढाई दोन ते पाच दिवसांत संपेल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात १५ दिवसांहून अधिक काळ उलटला तरी युद्ध संपण्याचे नाव घेत नाही. इराणची जवाबी रणनीती, प्रादेशिक राजकारण आणि जागतिक आर्थिक दबावांमुळे हा संघर्ष अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणावामुळे संपूर्ण जगाची नजर या युद्धावर खिळली आहे. अमेरिकेने या युद्धाला कमी लेखण्याची चूक केली का? जाणून घेऊया पाच मोठी कारणे. नेतृत्व संपविण्याची नीती फसली – अनेक लष्करी मोहिमांमध्ये अमेरिकेचा हल्ल्याचा पॅटर्न उघड झाला आहे. व्हेनेझुएलाचे निकोलस मादुरो यांच्याविरुद्ध कारवाईत त्यांना संपविण्यात आले नाही, तर इराकचे सद्दाम हुसेन यांनाही २००३ च्या युद्धात पकडून खटला चालवण्यात आला. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्याबाबत मात्र वेगळी रणनीती दिसली. इस्रायलने हमास व हिजबुल्लाचे नेतृत्व संपविण्याची नीती यशस्वीपणे राबवली. परंतु इराण हे दहशतवादी संघटन नसून एक पूर्ण देश आहे. त्यामुळे नेतृत्वावर हल्ला झाल्यानंतर इराण कोसळण्याऐवजी अधिक संघटित होऊन समोर आला. इराणला कमी लेखणे – १९७९ च्या इराणी क्रांतीनंतरच तेहरानने अमेरिकाविरुद्धच्या दीर्घ लढाईसाठी तयारी सुरू केली होती. खामेनेई यांच्या नेतृत्वाखाली इराणने हळूहळू शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्र यंत्रणा आणि प्रादेशिक प्रॉक्सी गट मजबूत केले. गेल्या वर्षी इस्रायल-अमेरिका-इराण यांच्यातील १२ दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर इराणला कळले की अमेरिकेच्या हवाई ताकदीशी थेट मुकाबला शक्य नाही. त्यानंतर इराणने भूमिगत क्षेपणास्त्र तळांमधून हजारो स्वस्त पण घातक ड्रोन्सचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केले, जे आज अमेरिकी सैन्यासाठी मोठे आव्हान बनले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीचे संकट – जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवरूनच हे संकट उद्भवले आहे. तणाव वाढण्यापूर्वी अमेरिकेने दबाव टाकून भारताला रशियाकडून तेल खरेदी कमी करण्यास राजी केले होते. मात्र इराणशी संघर्ष वाढताच जागतिक ऊर्जा संकट गडद होऊ लागले आणि अमेरिकेला आपली भूमिका बदलत भारताला पुन्हा रशियन तेल खरेदीची परवानगी द्यावी लागली. इराणवर हल्ल्यानंतर होर्मुझ बंद होण्याच्या शक्यतेचा योग्य अंदाज अमेरिकेला आला नव्हता, हे यातून स्पष्ट होते. स्वस्त ड्रोन्स व क्षेपणास्त्रांमुळे तेल जहाजांचे संरक्षण करणे अत्यंत खर्चिक व धोकादायक बनले आहे. हेही वाचा : भिवंडीत 84 LPG सिलिंडर जप्त; दोन टेम्पो चालक ताब्यात, अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ट्रम्प यांची परस्परविरोधी विधाने – सुरुवातीला ट्रम्प यांनी सांगितले होते की या युद्धाचा उद्देश इराणमध्ये सत्तापरिवर्तन घडवणे, तेथील जनतेला स्वातंत्र्य देणे आणि अणुकार्यक्रम रोखणे हा आहे. मात्र काळ जाईल तसे हे उद्दिष्ट धूसर होत गेले. अलीकडील विधानांमध्ये ट्रम्प उघडपणे सत्ताबदलाची भाषा बोलत नाहीत. त्यांच्या टीमचे वेगवेगळे व परस्परविरोधी बयान युद्धाची दिशा अस्पष्ट करत आहेत. इराणी जनतेने ट्रम्प यांची अपेक्षा फोल ठरवली – हल्ल्यापूर्वी इराणमध्ये सरकार आणि सर्वोच्च नेते खामेनेई यांच्याविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने होत होती. त्यामुळे ट्रम्प व नेतन्याहू यांना अपेक्षा होती की हल्ला होताच इराणची जनता रस्त्यावर उतरून सरकारला आव्हान देईल. परंतु असे मोठे जनआंदोलन झाले नाही. उलट जनता इराणच्या समर्थनार्थ एकवटली. सर्वोच्च नेत्याच्या निधनाने जनतेत दुःख व एकजूट निर्माण झाली आणि ट्रम्प यांचा हा अंदाज साफ चुकला. तसेच पहिलाच दिवसांमध्ये मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यामुळे देशात संताप उसळला आणि अमेरिका इस्त्रायल विरोधात सर्वजण एक होण्यास मदत झाली.