ट्रम्प टॅरिफमुळे काच उद्योगाला मोठा फटका, कोट्यवधींच्या ऑर्डर्स रद्द

वॉशिंग्टन: अमेरिकेने भारतावर 50% टॅरिफ लादल्यानंतर भारतीय काच उद्योगाला मोठा झटका बसला आहे. या टॅरिफमुळे कोट्यवधी रुपयांच्या ऑर्डर्स रद्द झाल्या असून, निर्यातदारांचे सुमारे 500 कोटी रुपये अडकले आहेत. यामुळे काच उद्योगातील व्यापारी नवीन बाजारपेठांच्या शोधात लागले आहेत.
फिरोजाबादमधील काच उद्योग संकटात –
उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद हे काच उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. येथील सुमारे 200 निर्यातदार विविध प्रकारची काचेची उत्पादने तयार करून ती सजवून जगभरात पुरवठा करतात. विशेषत: नववर्ष आणि ख्रिसमसच्या काळात या उत्पादनांना मोठी मागणी असते. यासाठी महिनो आधीपासून माल तयार केला जातो. हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठीही येथून मोठ्या प्रमाणात काचेची उत्पादने पुरवली जातात. मात्र, अमेरिकेच्या टॅरिफमुळे या उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
कोट्यवधींच्या ऑर्डर्स रद्द, निर्यातदार अडचणीत –
टॅरिफ वाढीमुळे काचेच्या उत्पादनांच्या किमती वाढल्या असून, अमेरिकन बाजारपेठेत मालाचा पुरवठा करणे कठीण झाले आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. फिरोजाबादच्या निर्यातदारांचे सुमारे 500 कोटी रुपये अमेरिकन बाजारपेठेत अडकले असून, ही रक्कम मिळवण्यासाठी उद्योजक चिंतेत आहेत.
नवीन बाजारपेठांचा शोध –
टॅरिफमुळे अमेरिकन बाजारपेठेतील संधी कमी झाल्याने निर्यातदारांनी आता जगातील इतर देशांमध्ये आपल्या उत्पादनांच्या विक्रीच्या संधी शोधण्यास सुरुवात केली आहे. निर्यातदार देवेंद्र तिवारी यांनी सांगितले, “आम्ही देशाच्या नीती आणि सन्मानासाठी सरकारच्या पाठीशी आहोत. अमेरिकेपुढे झुकण्याऐवजी आम्ही आमचा व्यापार वाढवण्यासाठी नवीन बाजारपेठा शोधत आहोत आणि अधिक चांगले प्रयत्न करत आहोत.”
दरम्यान, काच उद्योगातील उद्योजक आता युरोप, आशिया आणि इतर बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत आहेत. मात्र, टॅरिफमुळे निर्माण झालेल्या या संकटातून सावरण्यासाठी आणि अडकलेली रक्कम मिळवण्यासाठी सरकारच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे व्यापारी सांगतात.





