Trump Tariffs: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले आयात शुल्क घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिला असला तरी ट्रम्प यांनी न्यायालयाचा निर्णय चुकीचा असून आपण आगामी काळात इतर तरतुदीनुसार विविध देशाविरोधात आयात शुल्क लावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या देशाबरोबर व्यापार करारासंदर्भात अमेरिकेची चर्चा चालू आहे त्या देशांनी संबंधित चर्चेनुसार आयात शुल्क मान्य करावे अन्यथा अशा देशाविरोधात आपण जास्त आयात शुल्क लावू अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेने युरोप, भारत, इंडोनेशिया आणि इतर काही देशाबरोबर प्राथमिक स्वरूपाचा व्यापार करार करण्यासंदर्भात चर्चा सुरू केली आहे. या अंतर्गत अमेरिका संबंधित देशाविरोधात किती आयात शुल्क लावणार आणि संबंधित देश किती आयात शुल्क लावणार याची आकडेमोड चालू आहे. अमेरिका भारता विरोधात 18 टक्के आयात सुरू लावणार आहे. तर भारत अमेरिके विरोधात 0% आयात शुल्क लावणार आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. त्यामुळे व्यापार करारातील आयात शुल्क नेमके किती राहील याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत युरोप आणि भारतासारखे देश व्यापार करारावरील चचला स्थगिती देत आहेत. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली असल्याचे समजले जाते. ट्रम्प यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या चुकीच्या निर्णयाचा वापर करून कोणताही देश जर अमेरिके विरोधात काही खेळी करत असेल तर त्यांच्या विरोधात आपण जास्त आयात शुल्क लावणार आहोत. अनेक देशांनी अमेरिकेविरोधात जास्त आयात शुल्क लावून अमेरिकेला निर्यात मात्र जास्त केली होती. आता हे देश करारावरील चर्चा चालू असताना सर्वोच्च न्यायालयाचा वापर करून चर्चा थांबवीत आहेत. त्यांनी सावध राहावे असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही आयात शुल्कात धरसोड धोरण सुरू केले आहे. अगोदर त्यांनी दहा टक्के लावले होते. आता पंधरा टक्के केले आहे. त्यातील दहा टक्के आयात शुल्कबाबत अधिसूचना निघाली असताना पाच टक्के शुल्काबाबत मात्र अधिसूचना निघालेली नाही. त्यामुळे जगभरातील निर्यात दारामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.