Mohan Bhagwat : विविधतेतच खरी एकता; मोहन भागवतांचे बंगालमध्ये वक्तव्य

बर्धमान (पश्चिम बंगाल) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी विविधतेच्या स्वीकारावर भर देत हिंदू समाज हा देशाचा जबाबदार समाज असल्याचे मत व्यक्त केले. बर्धमान येथील साई ग्राउंडवर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या सभेने त्यांचा १० दिवसांचा पश्चिम बंगाल दौराही समाप्त झाला आहे. पुढील वर्षी होणा–या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर ही सभा महत्त्वाची मानली जात आहे.
मोहन भागवत म्हणाले, लोक विचारतात की आम्ही हिंदू समाजावरच भर का देतो? कारण हा समाज जबाबदारी स्वीकारणारा आहे. संघ हिंदू समाज संघटित करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत फक्त भूगोल नाही, तर त्याला एक विशिष्ट प्रकृती आहे. जे लोक या मूल्यांनुसार राहू शकले नाहीत, त्यांनी वेगळा देश निर्माण केला. मात्र, येथे राहणाऱ्यांनी भारताचा मूळ गाभा स्वीकारला आणि तो म्हणजे हिंदू समाज. विविधतेत एकता असे आपण म्हणतो, पण हिंदू समाजाचे मत आहे की विविधतेतच खरी एकता आहे.
भागवत यांनी भगवान राम व भरत यांचे उदाहरण देत सांगितले की, भारत सम्राटांना नव्हे, तर आपल्या मूल्यांना मानतो. १४ वर्षे वनवास पत्करणाऱ्या रामाचा, तसेच सिंहासनावर भावाच्या पादुका ठेवून राज्य करणाऱ्या भरताचा सन्मान केला जातो. हेच भारताचे खरे तत्वज्ञान आहे. जे या मूल्यांचे पालन करतात, ते हिंदू आहेत आणि देशाच्या विविधतेला एकत्र ठेवतात. हिंदू समाज संघटित करण्याची गरज असल्याचे सांगताना भागवत म्हणाले, समस्यांचे स्वरूप काय आहे, यापेक्षा आपण त्या सोडविण्यास किती सक्षम आहोत, हे महत्त्वाचे आहे.





