मंचर, (प्रतिनिधी) – पुणे-नाशिक महामार्गावरील एकलहरे (ता. आंबेगाव) येथे समोरच्या गाडीने ब्रेक दाबल्याने ट्रक चालकाने ही अचानकपणे ब्रेक दाबला. त्यामुळे ट्रक केबिनच्या मागील बाजूला भरलेला पुठ्ठा व अन्य साहित्य केबिनवर आदळून ट्रक रस्त्यावर आडवा होऊन ट्रकचे नुकसान झाले आहे. हा अपघात गुरुवारी (दि. 6) पहाटे झाला. मालट्रक (एमएच 46 एआर 5533) हा उरळीकांचन येथून नाशिकच्या दिशेला जात होता. समोरच्या गाडीने ब्रेक दाबल्याने मालट्रक चालकाने ही अचानकपणे ब्रेक दाबला. त्यामुळे ट्रक केबिनच्या मागील बाजूला भरलेला पुठ्ठा व अन्य साहित्य केबिनवर आदळून ट्रक रस्त्यावर आडवा होऊन ट्रकचे नुकसान झाले आहे. माल ट्रकची दोन्ही चाक एक्सेलसह 40 ते 50 खूप दूर गेली. अशाही अवस्थेतून महावीर कल्याण मोटे हा चालक सुखरूप वाचला आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व कर्मचार्यांनी ट्रकमधील पुठ्ठे व अन्य साहित्य चोरीला जाऊ, नये म्हणून येथे सुरक्षा व्यवस्था उभी केली होती. तसेच अन्य लेनमधून नारायणगावच्या दिशेने वाहने जाण्याची व्यवस्था केली होती. मंचरची हद्द सोडल्यानंतर बायपास पुलावरून भरधाव गाड्या एकलहरे नारायणगावच्या दिशेने जातात. त्यामुळे दर आठवड्याला किमान दोन ते तीन अपघात एकलहरे परिसरात होतात. अपघाताचे सत्र टाळण्यासाठी इंडियन ऑइल कंपनी सीएनजीपंपासमोर स्पीड ब्रेकर बसवावा, अशी मागणी नागरिक व प्रवाशांनी केली. त्यामुळे अपघाताचे सत्र थांबेल असेही प्रवाशांनी सांगितले.