ओतूर – नगर-कल्याण महामार्गावर मोनिका चौक येथे नाकाबंदी वाहन तपासणी दरम्यान गुरुवारी (दि. १२) रात्री ११ वाजता आळेफाटा बाजूकडून आलेल्या ट्रकमधून ११ गोवंश जनावरे दाटीवाटीने, चारा पाण्याची व्यवस्था न करता रस्सीच्या सहाय्याने बांधून ठेवल्याचे आढळून आले. याबाबत ट्रकचालक गुजम्मील इनामदार यांच्याकडे चौकशी केली असता त्याने गोवंश जनावरे वाहतुकीबाबत त्याचेकडे कोणताही परवाना तसेच गोवंश वैद्यकीय तपासणी सर्टिफिकेट नसल्याचे सांगितले. तसेच ११ गोवंश जनावरे ही बेल्हे (ता. जुन्नर) येथे विशाल व इर्शाद नावाचे इसम पूर्ण नाव पत्ता माहीत नाही. तसेच फैजान शेख (रा. कल्याण) या तिघांनी माझ्या टाटा टर्बो ट्रकमध्ये भरले असून फैजान शेख याचेकडे कल्याण येथे घेऊन जात असल्याचे पोलिसांना सांगितले. गणेशोत्सव सण व आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यात गोवंश जनावरांची अवैध वाहतूक व अवैध कत्तल यावर प्रतिबंध करणेबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सर्व पोलीस स्टेशनला सूचना दिल्या होत्या. बेल्हे येथून एका ट्रकमधून गोवंश जनावरांची कत्तलीचे उद्देशाने कल्याण येथे वाहतूक करून घेऊन जाणार असल्याची गोपनिय माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ११ गोवंश जनावरे व टाटा टर्बो ट्रक (एमएच १४ एएस ९३९७) असा एकूण २३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. ११ गोवंश जनावरे सुरक्षेचे व संगोपणाचे दृष्टीने पुणे येथील गोशाळे मध्ये जमा करण्यात आली आहेत. या गुन्ह्यात मिळून आलेला चालक गुजग्मील अब्दुल हमीद इनामदार यास अटक करण्यात आली. त्यास न्यालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे. दाखल गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिनेश साबळे हे करत आहेत.