त्रिपुुरात एचआयव्ही बाधित 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू

त्रिपुरा : त्रिपुरात एचआयव्हीची लागण झाल्यामुळे 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून राज्यात अशी लागण झालेले तब्बल ८२८ विद्यार्थी आतापर्यंत आढळून आले असल्याची खळबळजनक बातमी आहे. त्रिपुरा एड्स नियंत्रण सोसायटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याची बातमी एएनआयने दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लागण झालेल्या ८२८ विद्यार्थ्यांपैकी ५७२ विद्यार्थी अद्याप जिवंत आहेत तर अनेक विद्यार्थी प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी त्रिपुराच्या बाहेर निघून गेले आहेत.
एड्स कंट्रोल सोसायटीने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये याबाबत तपासणी केली होती. यात इंजेक्शनद्वारे अमली पदार्थांचे सेवन करत असलेली मुले हुडकण्यात आली. रोज किमान ५ ते ७ एचआयव्ही बाधित झालेली प्रकरणे समोर येत असल्याची धक्कादायक माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणांत अचानक झालेल्या वाढीमागे अमली पदार्थांचे सेवन हेच प्रमुख कारण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
तसेच ज्या मुलांना लागण झाली आहे त्यातील बहुतेक मुले ही संपन्न कुटुंबांतील आहेत. यातील अनेक मुलांचे आई आणि वडील दोघे सरकारी सेवेत आहेत. आपले मूल अमली पदार्थांच्या आहारी गेले आहे हे त्यांना कळते तोपर्यंत खूप उशीर झाला असतो असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.





