Tripti Dimri : ४० लाखांवरून ४ कोटी झाले ‘तृप्ती डिमरी’चे मानधन; दीपिका पदुकोणचीही जागा घेतली

Tripti Dimri : बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. २०२३ मध्ये रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटात तिच्या छोट्या भूमिकेमुळे रातोरात स्टार बनलेल्या तृप्तीने आता एक मोठा टप्पा गाठला आहे. संदीप रेड्डी वांगाच्या पुढील चित्रपट ‘स्पिरिट’ मध्ये तृप्ती डिमरी दीपिका पदुकोणची जागा घेणार आहे. त्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे.
तृप्ती डिमरी ‘स्पिरिट’ मध्ये साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहे. या प्रोजेक्टसाठी तिचे मानधन आतापर्यंत ‘अॅनिमल’ पासून १० पटीने वाढले आहे. २०२३ मध्ये ‘अॅनिमल’ साठी तृप्तीने सुमारे ४० लाख रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जाते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
त्यानंतर तिची लोकप्रियता प्रचंड वाढली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘अॅनिमल’ नंतर तृप्तीने ‘बॅड न्यूज’ साठी ८० लाख रुपये आणि ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ साठी १ कोटी रुपये मानधन वाढवले. आता ‘स्पिरिट’ साठी तिचे मानधन ४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे, जे तिच्या सुरुवातीच्या मानधनापेक्षा १० पट जास्त आहे. मात्र, त्याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही.
‘स्पिरिट’ बद्दलची चर्चा तेव्हा वाढली जेव्हा दीपिका पदुकोणने या चित्रपटासाठी २० कोटी रुपयांची मोठी फी आणि ६-८ तासांची शिफ्ट मागितल्याची बातमी आली. याशिवाय दीपिकाने चित्रपटाचा नफा वाटून घेण्याची अटही घातली होती, जी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी मान्य केली नाही. परिणामी, दीपिकाला चित्रपटातून बाहेर काढण्यात आले आणि तृप्तीला साइन करण्यात आले.
तृप्ती डिमरीच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्री गेल्या ६ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तिने २०१७ मध्ये ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. याशिवाय तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तिच्या अभिनय कौशल्याचा प्रसार केला आहे.
अभिनेत्रीने नेटफ्लिक्सच्या ‘काला’, ‘बुलबुल’ आणि ‘लैला मजनू’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तृप्ती डिमरीचे इंस्टाग्राम आणि फेसबुकवर लाखोंच्या घरात फॉलोवर्स असून, चाहते नेहमीच अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करत असतात.





