नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील वाढत्या बिबट हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बिबट निवारा केंद्राचा विस्तार करून बिबट्यांची क्षमता संख्या तिप्पट म्हणजेच 150 इतकी करण्यात येणार आहे. बिबट्यांना आवर घालण्यासाठी 300 पिंजरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी जुन्नर तालुक्यात विशेष बिबट्या संरक्षण दलाची निर्मिती करण्यात येणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, भाजप नेत्या आशा बुचके यांच्यासह तालुक्यातील काही प्रमुख नेते आणि वन विभाग तसेच इतर सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जुन्नर तालुक्यातील बिबट्यांची संख्या व मानवावरील वाढते हल्ले याचे गांभीर्य लक्षात घेऊन बिबटे सरसकट पकडून इतरत्र हलविण्याचे ठरवले आहे. यासाठी अधिकचे लागणारे पिंजरे येत्या दोन महिन्यांमध्ये 300 पिंजरे उपलब्ध करून दिले जाणार आहे. शेतकर्यांवरील गुन्हे मागे घेणार बिबट्याने मानवावर केलेल्या हल्ल्यामुळे शेतकरी आणि वनविभागाचे अधिकारी यांच्यात वाद झाला होता. त्यातून शेतकर्यांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हे मागे घेतले जातील, असा निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. थ्री फेज वीजपुरवठा; मुजोर अधिकार्यांची… विशेष बाब म्हणून जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर भागातील शेतीसाठी दिवसा थ्री फेज वीज पुरविण्यासाठी सरकारकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मेंढपाळ व्यवसायिकांसाठी तंबू, बॅटरी आणि सोलर लाइटची व्यवस्था राज्य आपत्ती निवारण निधीतून करण्यात येणार आहे. तसेच मुजोर अधिकार्यांवर कारवाई करण्यासंदर्भात खात्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.