Women Maharashtra Kesari : ‘ट्रिपल महाराष्ट्र केसरी’ भाग्यश्री फंडची ऐतिहासिक माघार! यंदा कुणाच्या खांद्यावर असणार मानाची गदा?
Women Maharashtra Kesari : सलग तीनदा हा किताब पटकावणाऱ्या भाग्यश्री फंड हिने यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्याने कुस्ती क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Bhagyashri Fund Triple Women Maharashtra Kesari : महिला कुस्ती क्षेत्रातील सर्वात मानाचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब सलग तीन वेळा जिंकून इतिहास रचणारी भाग्यश्री फंड यंदाच्या चौथ्या वरिष्ठ गट महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होणार नाही. वजन वाढवण्यातील तांत्रिक अडचणींमुळे तिने हा निर्णय घेतला आहे. मात्र, स्पर्धेतून बाहेर असूनही तिने यंदाच्या संभाव्य विजेत्यांबाबत भाष्य केले आहे.
का घेतली स्पर्धेतून माघार?
भाग्यश्रीने स्पष्ट केले की, सध्या तिचा वजनी गट ५९ ते ६२ किलो आहे, तर महाराष्ट्र केसरी किताबासाठी ६५ ते ७६ किलो वजनी गट असणे अनिवार्य आहे. अचानक इतके वजन वाढवणे शारीरिकदृष्ट्या कठीण असल्याने तिने यंदाच्या स्पर्धेतून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. “गेली तीन वर्षे ट्रिपल महाराष्ट्र केसरी पद टिकवण्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, पण यंदा वजन हा मोठा अडथळा ठरला,” असे भाग्यश्री म्हणाली.
कोण होणार नवी ‘महाराष्ट्र केसरी’?
भाग्यश्रीच्या अनुपस्थितीत यंदा विजेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाग्यश्रीच्या मते, यंदा अमृता पुजारी, अपेक्षा पाटील आणि वैष्णवी पाटील यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळेल. गेल्या वर्षी भाग्यश्रीने फायनलमध्ये अमृता पुजारीला पराभूत केले होते, त्यामुळे यंदा अमृतावर सर्वांच्या नजरा असतील.
“ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले, पण नोकरी नाही!”
विजयाचा आनंद व्यक्त करतानाच भाग्यश्रीने सरकारी धोरणांवर नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, “पुरुषांमध्ये महाराष्ट्र केसरी झाल्यावर लगेच शासकीय नोकरी मिळते. मात्र, मी तीन वेळा हा किताब जिंकूनही अद्याप बेरोजगार आहे. अनेक प्रयत्न करूनही शासनाकडून अद्याप नोकरीची संधी मिळालेली नाही.” एका चॅम्पियन खेळाडूने व्यक्त केलेली ही खंत क्रीडा वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.


