Women Maharashtra Kesari : सोलापूर येथे निर्झरा केअर फाऊंडेशनतर्फे २८ आणि २९ मार्चला आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत (Women Maharashtra Kesari) विजेत्या कुस्तीपटूला ‘महाराष्ट्र केसरी’ किताब, मानाची गदा आणि किया सोनेट कार देऊन गौरविण्यात येणार आहे, तर उपविजेत्या कुस्तीपटूला बुलेट दुचाकी दिली जाईल. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहात चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त (Women Maharashtra Kesari) रविवारी वासा पूजन समारंभ व माती पूजन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात कल्याणशेट्टी यांच्या हस्ते महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्याला देण्यात येणाऱ्या बक्षिसांचे अनावरण करण्यात आले. मॅटवर होणाऱ्या या स्पर्धेसाठी ५० किलो, ५३ किलो, ५५ किलो, ५७ किलो, ५९ किलो, ६२ किलो, ६५ किलो, ६८ किलो, ७२ किलो तसेच महाराष्ट्र केसरी गट (६५ ते ७६ किलो) असे वजनी गट ठेवण्यात आले आहेत. या प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके दिली जाणार आहेत, तर प्रत्येक गटातील सुवर्णपदक विजेत्याला ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. Women Maharashtra Kesari “निर्झरा केअर फाउंडेशनच्या संचालिका स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी स्वतःच्या नफा व नुकसानीचा विचार न करता आपल्या वडिलांचा वारसा जपण्याचे काम करण्यासाठी सोलापूरमध्ये महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. ही स्पर्धा यशस्वी करून संपूर्ण राज्यात सोलापूरने आदर्श कुस्ती स्पर्धा भरवली असा नावलौकिक करण्यासाठी आपण सर्वजण मिळून तन-मन-धनाने काम करू आणि महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे शिवधनुष्य पेलूया,असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. “स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी आपल्या वडिलांच्या कुस्तीच्या सेवेसाठी व त्यांच्या छंदाला न्याय देण्याचे उल्लेखनीय काम केले आहे. एखादी स्पर्धा आयोजित करण्यासाठी एखाद्या निवडणुकीइतकाच खर्च येतो, तो खर्च स्वाती अळ्ळीमोरे व सोमनाथ अळ्ळीमोरे स्वतःची पदरमोड करून करतात हे खरोखरच कौतुकास्पद आहे,” असे कल्याणशेट्टी पुढे म्हणाले. सोलापूर शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख, महापौर विनायक कोंड्याल, पाटबंधारे खात्याचे माजी सचिव चन्नवीर बिराजदार, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, राजाभाऊ देशपांडे, सोमनाथ पटणे, कुस्ती सम्राट अस्लम काझी, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, भीमराव बाळगे, केदार स्वामी आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राज साळुंखे, भरत मेकाले, नेताजी खंडागळे, सुधीर लांडे, गुड्डू पटणे, चन्नवीर बिराजदार आदींनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्वाती अळ्ळीमोरे म्हणाल्या की, “वडील सिद्धाराम साखरे हे ज्येष्ठ कुस्तीपटू होते. त्यांचा वारसा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुलींसाठी ही स्पर्धा एक मोठी संधी आहे. या स्पर्धेत भाग घेऊन मुलींनी मजबूत आणि सक्षम असल्याचे दाखवून द्यावे. या स्पर्धेत शिस्त आणि पारदर्शकता यांना प्राधान्य दिले जाईल. मुलींना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा स्पर्धेदरम्यान उपलब्ध केल्या जातील.” या कार्यक्रमास सोमनाथ अळ्ळीमोरे, आतिश मोरे, समीर कोळेकर, दीपक चौगुले, गोपीनाथ घोडके, अमर दुधाळ, दादासाहेब सरवदे, अर्जुन साठे, अनिल म्हाळगे, धीरज सरवदे, विलास कोरे यांच्यासह कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुस्ती निवेदक युवराज केचे यांनी केले. सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर पेठ परिसरात असलेल्या हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर ही प्रतिष्ठेची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक खेळाडू सहभागी होणार असून महिला महाराष्ट्र केसरी किताबासाठी भाग्यश्री फंड चौथ्यांदा जिंकण्यासाठी उत्सुक आहे. यापूर्वी तिने तीन वेळा हा किताब जिंकला आहे, अशी माहिती निर्झरा केअर फाऊंडेशनच्या संचालिका आणि संस्थापक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी दिली. वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्पर्धेचे आयोजन स्वाती यांचे वडील सिद्धाराम साखरे हे स्वतः ज्येष्ठ कुस्तीपटू, पोलीस अधिकारी व समाजसेवक होते. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी निर्झरा केअर फाऊंडेशनची २०२३मध्ये स्थापना केली. स्वाती अळ्ळीमोरे-साखरे म्हणाल्या की, “सोलापूर जिल्ह्यामध्ये कुस्तीसाठी चांगले नैपुण्य आहे. मात्र अव्वल दर्जाच्या सुविधा, आखाडे व स्पर्धांचे व्यासपीठ याअभावी या खेळाडूंना अपेक्षेइतके आंतरराष्ट्रीय दर्जाचे करिअर करता येत नाही, हे लक्षात घेऊनच आम्ही निर्झरा फाऊंडेशनतर्फे कुस्तीगिरांच्या विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेत आहोत.”