Newasa : चार सुवर्णपदकांची कमाई! त्रिमूर्तीच्या 15 तलवारबाजांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Newasa : नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या ३५ खेळाडूंनी जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत सहभाग घेतला. चार सुवर्णपदकांसह १५ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

Newasa : क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीने कोपरगाव येथे जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. संकुलातील ३५ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यापैकी १५ खेळाडूंची विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली असून, चार खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवले.
६ ऑक्टोबर रोजी श्री सद्गुरु गंगागिरीजी महाराज महाविद्यालय, कोपरगाव येथे ही स्पर्धा झाली. कनिष्का लहू गिरी (इयत्ता आठवी), अनुष्का मते (इयत्ता नववी), आभा व्हरे (इयत्ता बारावी) आणि रिया चांदणे (इयत्ता सातवी) यांनी सुवर्णपदक पटकावले. आयमन पटेल (इयत्ता नववी) याने रौप्यपदक मिळवले.
विभागीय स्पर्धेसाठी आदिती साबळे (दहावी), अनुजा तांदळे (बारावी), राजेश्वरी गोल्डे (सातवी), सोहम डमाळ (नववी), नंदकिशोर ढवळे (नववी), जयराज पठारे (नववी), समर्थ गाडे (नववी), नैतिक थोरवे (अकरावी), आकाश पवार (अकरावी) आणि सार्थक गोरे (अकरावी) यांचीही निवड झाली आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा अॅड. सुमती घाडगे, उपाध्यक्षा अॅड. स्नेहल चव्हाण, विश्वस्त चेतन चव्हाण, डॉ. गौरव आमले, सहसचिव डॉ. श्रुती आमले, प्राचार्य सोपान काळे, क्रीडा संचालक संभाजी निकाळजे आणि सर्व प्राचार्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. विभागीय स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूंना प्रशिक्षक अभिजीत दळवी, संभाजी निकाळजे, महादेव काकडे, छबुराव काळे, अशोक पानकडे, साहेबराव दाणे, शैलेश दाणे तसेच सर्व सैनिकी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळत आहे.





