श्रद्धांजली : चळवळीतील ‘सप्तर्षी’
Dr. Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी आणि गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी (Dr. Kumar Saptarshi) यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी, सामाजिक चळवळींचा आधारस्तंभ हरपला आहे.

– डॉ. हुसेन दलवाई
Dr. Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी आणि गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी (Dr. Kumar Saptarshi) यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी, सामाजिक चळवळींचा आधारस्तंभ हरपला आहे.
महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय इतिहास युक्रांदला वगळून लिहिता येणार नाही. आज देशाचे राजकारण एका विचित्र वळणावर आलेले असताना, समाज एका विचित्र परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना सप्तर्षी (Dr. Kumar Saptarshi) आपल्यातून निघून गेले आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असताना कुमार सप्तर्षी आणि डॉ. अनिल अवचट यांनी तत्कालीन सामाजिक प्रश्न हाती घेऊन विद्यार्थ्यांपासून संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली.
त्यासंदर्भात विविध तरुणांशी संवाद साधत बैठका, चर्चासत्रे घेत संघटनाबांधणीस प्रारंभ केला. पुढे डॉक्टर झाल्यानंतर 1970च्या दशकात त्यांनी युवक क्रांती दल अर्थात ‘युक्रांद’ नावाची संघटना स्थापन केली. सुरुवातीला युक्रांत पुण्यापुरती मर्यादित होती. परंतु त्यांचे लढे सतत सुरू होते. यादरम्यान जॉर्ज फर्नांडीस यांची आणि कुमार सप्तर्षींची एकदा भेट झाली. त्यांनी युक्रांदच्या स्थापनेमागचा उद्देश, भूमिका ऐकून घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर हे संघटन उभे राहायला हवे अशी सूचना केली.
त्याकाळात आम्ही मुंबईमध्ये समाजवाद्यांच्या योजन सभेमध्ये काम करत होतो. जॉर्ज फर्नांडीस यांनी आम्हाला बोलावून युक्रांदविषयीची माहिती सांगितली आणि ते समाजवादी पक्षाशी संबंधित नसले तरी त्यांची विचारधारा समाजवादी आहे. त्यामुळे तुम्ही एकत्र आलात तर या लढ्याला बळकटी मिळेल अशा सूचना केल्या.
त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती राहिलेले हेमंत गोखले यांनी पुण्याला जाऊन सप्तर्षी (Dr. Kumar Saptarshi) आणि अनिल अवचट यांच्याशी चर्चा केली आणि आमच्यासमोर प्रस्ताव ठेवला.
आम्ही तो स्वीकारला आणि मुंबईमध्ये युवक क्रांती दल स्थापन केले. त्यानिमित्ताने सातत्याने पुण्याला येऊन सप्तर्षींची भेट घ्यायचो. उरळीकांचनमध्ये जवळपास आठ-आठ तास आम्ही चर्चा करायचो. युक्रांदचे वैशिष्ट्य असे होते की, दरवर्षी महाराष्ट्र पातळीवर एका शिबिराचे आयोजन केले जात असे. या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांसाठीचे विविध कार्यक्रम ठरायचे. विशेषतः दलितांवर अन्याय-अत्याचार होत असत तेव्हा युक्रांद त्याविरुद्ध लढा देण्यात अग्रेसर असायची. कुमार सप्तर्षींनी पुण्यामध्ये कृषी विद्यापीठासंदर्भात एक मोठे आंदोलन केले. त्यातून युक्रांदला मोठी ताकद मिळाली. युक्रांद ही तरुणांना लोकशाही मूल्ये, मानवी हक्क आणि सामाजिक न्यायासाठी लढायला शिकवणारी एक प्रयोगशाळा होती.
कुमार सप्तर्षी हे अत्यंत बुद्धीवान आणि तितकेच संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. उत्कृष्ट वक्तृत्व हे त्यांचे गुणवैशिष्ट्य होते. मला आठवतंय, त्याकाळात शेकडो युवकांसमोर ते भाषण करायचे तेव्हा उपस्थित असणारा समुदाय अक्षरशः संमोहित व्हायचा. तास तासभर लोक त्यांचे भाषण शांतपणाने ऐकायचे. पुरीच्या शंकराचार्यांविरोधात प्रश्न उपस्थित करून त्यांनी हिंदुत्ववाद्यांना निरुत्तर करून टाकले. कृषी विद्यापीठाच्या लढ्यामध्ये सप्तर्षी यांना तुरुंगात जावे लागले होते. तशाच प्रकारे सोलापूरला डॉक्टरांकडून घेतल्या जाणार्या कॅपिटेशन फी विरोधात युक्रांदने मोठा लढा दिला.
त्या लढ्यातही सप्तर्षी यांना तुरुंगात जावे लागले होते. त्याकाळात डॉ. अरुण लिमये युक्रांदच्या लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी गेले; पण त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आले. मग मुंबईतून मी आणि गिरीश नार्वेकर सोलापूरला गेलो. पण आम्हालाही पकडण्यात आले. तथापि, या सर्व लढ्यांच्या माध्यमातून युक्रांद संपूर्ण महाराष्ट्रभर विशेषतः मराठवाड्यामध्ये पसरली.
डॉ. राममनोहर लोहिया व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा सप्तर्षी यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले. वस्तुतः आम्ही निवडणुका लढायच्या नाहीत अशा भूमिकेत होतो. त्यामुळे सप्तर्षी यांनी युवक क्रांती दल सोडले आणि जनता पार्टीतून अहमदनगरची विधानसभा निवडणूक लढली. त्या निवडणुकीत विजय मिळवला. आमदार झाल्यामुळे प्रत्यक्ष विधीमंडळामध्ये जनतेचे प्रश्न मांडण्याची आणि त्या प्रश्नांची, समस्यांची सोडवणूक करण्यासाठी उपाययोजना करण्याची संधी मिळाली.
पुढील काळात जनता पक्षाचे सरकार कोसळले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सप्तर्षी यांचा पराभव झाला. पुढील काळात करमाळ्यातूनही त्यांनी निवडणूक लढवली होती; पण त्या निवडणुकीतही त्यांना यश मिळाले नाही. तेव्हापासून निवडणुकांच्या आणि पक्षांच्या राजकारणापासून बाजूला जात पुन्हा त्यांनी युक्रांदची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न केला.
अलीकडील काळात महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचा पदाधिकारी म्हणून सप्तर्षी यांची निवड झाली आणि पुढे जाऊन ते अध्यक्षही बनले. या ट्रस्टला त्यांनी खर्या अर्थाने जिवंत केले. महात्मा गांधींचे विचार या विषयावर सातत्याने विविध अभ्यासकांच्या भाषणांचे आयोजन करून गांधीवादाला नवसंजीवनी दिली. विशेषतः तरुण मंडळींना गांधींच्या विचारसरणीशी, अहिंसावादाशी जोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.
‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाच्या माध्यमातून समाजवादी विचारांचा प्रसार-प्रचार करतानाच एकाधिकारशाहीवादी राजसत्तेशी वैचारिक संघर्षाची भूमिका कायम ठेवली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या मासिकाच्या दैनंदिन कामात ते लक्ष ठेवून होते. त्यांच्या जाण्याने गांधीवादाचे एक पर्व संपले.
सप्तर्षी (Dr. Kumar Saptarshi) हे मूलतः लढवय्ये होते. इतिहास, तत्त्वज्ञान, उत्क्रांतीशास्त्र, सामाजिक विज्ञान, विकास, राजकारण, भांडवलशाही, समाजवाद, साम्यवाद, जडवाद, गांधीवाद, अध्यात्म, वैराग्य, बुद्धांचा धम्म, महावीरांचं तत्त्वज्ञान, चार्वाक, फुले-आंबेडकरवाद, जातिव्यवस्थेचं गौडबंगाल अशा असंख्य विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास होता. कुमार सप्तर्षी हा विचार होता. विचार करतानाही त्यांनी कधी सत्याग्रह सोडला नाही. ज्या-ज्या ठिकाणी असंतोष आहे, त्या असंतोषाविरोधात संघर्ष करणे हा त्यांचा मूलतः पिंड होता.
त्यांनी आयुष्यभर जातीव्यवस्था, जातीयवाद आणि गरिबीविरोधात प्रखर लढा दिला. ग्रामीण विकास, शैक्षणिक सुधारणा आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत 2025 मध्ये ‘बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने देशभरातील सामाजिक चळवळीतील एक मोठा आधारस्तंभ हरपला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील परिवर्तनाच्या पर्वाचे प्रतीक म्हणून त्यांचे योगदान अमूल्य आहे.






