श्रद्धांजली : व्याकरण तपस्विनी
रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये जन्मलेल्या यास्मिन (Yasmin Shaikh) यांचे मूळ नाव जेरुशा. वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे कुटुंबाचे वास्तव्य वारंवार बदलत राहिले; पण जेरुशाची मराठीशी जुळलेली नाळ कायम राहिली.

– डॉ. जयदेवी पवार
Yasmin Shaikh : मराठी भाषा कशी लिहावी, तिचे व्याकरण कसे असावे आणि बदलत्या काळात तिच्या मूळ प्रकृतीचे भान कसे जपावे, याविषयी आयुष्यभर आग्रह धरणार्या ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख (Yasmin Shaikh) यांच्या जाण्याने भाषाशुद्धतेच्या प्रवासातील एका पर्वाचा अंत झाला आहे.
अलीकडेच प्रा. यास्मिन शेख (Yasmin Shaikh) यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती. शतकभराचे आयुष्य ही एखाद्या व्यक्तीची ओळख ठरू शकते; पण यास्मिन शेख यांच्याबाबतीत या शतकाचा अर्थ वेगळा होता. कारण, या शंभर वर्षातील 7 दशकांहून अधिक काळ म्हणजे तब्बल 70 वर्षे मराठीच्या शब्दांशी, त्यांच्या रचनेशी, शुद्धलेखनाशी आणि व्याकरणाशी निष्ठेने जोडलेला होता.
व्याकरण हा रुक्ष नियमांचा पसारा नव्हे, तर नीट रचलेल्या कवितेसारखी नाजूक आणि सुंदर व्यवस्था आहे, असे मानणार्या त्या शिक्षिका होत्या. मराठीच्या प्रमाणलेखनावर प्रेमाने, पण तितक्याच काटेकोरपणे लक्ष ठेवणारा एक सजग पहारेकरी त्यांच्या जाण्याने हरपला आहे.
रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये जन्मलेल्या यास्मिन (Yasmin Shaikh) यांचे मूळ नाव जेरुशा. वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे कुटुंबाचे वास्तव्य वारंवार बदलत राहिले; पण जेरुशाची मराठीशी जुळलेली नाळ कायम राहिली. लहानपणापासूनच त्यांचे जग शब्दांनी भरलेले होते. घरात नाथमाधव, ह. ना. आपटे यांच्या कादंबर्या आणि ‘स्त्री’सारखी नियतकालिके पेट्यांमध्ये जपून ठेवलेली असत. त्या पेट्या उघडून पुस्तके वाचणे हा छोट्या जेरुशाचा आनंद होता.
शब्द, साहित्य आणि संगीत अशा वातावरणात वाढलेल्या जेरुशाला पुढे पंढरपूरच्या मराठी माध्यमाच्या शाळेत तळेकर नावाचे शिक्षक लाभले. त्यांनी शिकविलेले व्याकरण अवघड नियमांचे ओझे न वाटता भाषेतील रचना शोधण्याचा आनंद वाटू लागला.
पुढील आयुष्याची दिशा तेथेच निश्चित झाली होती. पुण्याच्या स. प. महाविद्यालयात शिक्षण घेताना श्री. म. माटे आणि के. ना. वाटवे यांसारख्या विद्वान शिक्षकांचा सहवास त्यांना लाभला. त्यातून भाषाशास्त्र आणि व्याकरणाविषयीची ओढ अधिक दृढ झाली.
पुढे अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी विवाह झाला आणि जेरुशा या यास्मिन शेख झाल्या. जन्माने ज्यू, विवाहाने मुस्लीम कुटुंबाशी जोडलेल्या आणि कर्माने मराठी भाषेला वाहून घेतलेल्या त्यांच्या आयुष्यानेच ‘भाषेला धर्म नसतो’ या त्यांच्या विचाराला एक विलक्षण प्रत्यय दिला. वयाच्या शंभरीतही त्यांनी भाषा ही धर्माच्या किंवा सीमांच्या चौकटीत बंदिस्त करता येत नाही, अशी भूमिका मांडली होती.
शाळा आणि महाविद्यालय स्तरावर त्यांनी सुमारे 34 वर्षे अध्यापन केले. मुंबईतील एसआयईएस महाविद्यालयात त्या मराठी विभागप्रमुख होत्या. मराठी शिकवताना विद्यार्थ्यांना व्याकरणाची भीती न घालता त्यामागील तर्क, लय आणि सौंदर्य समजावून देणे ही त्यांची खासियत होती. त्यांच्या कार्याचे महत्त्व मात्र वर्गखोलीच्या पलीकडे आहे. प्रशासकीय सेवांच्या परीक्षार्थींनाही त्यांनी व्याकरण आणि भाषाशास्त्राचे प्रशिक्षण दिले. बालभारतीच्या पाठ्यपुस्तक संपादनापासून नियतकालिकांमधील भाषाविषयक मार्गदर्शनापर्यंत त्यांचा संचार होता.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रमाण मराठी लेखनाला एकसंध रूप देण्याच्या प्रयत्नांत त्या सहभागी झाल्या. 1962 मध्ये राज्य शासनाने स्वीकारलेल्या 14 लेखननियमांच्या निर्मितीच्या काळात मराठी साहित्य महामंडळाशी त्यांचा संबंध होता; 1972 मध्ये त्यात आणखी 4 नियमांची भर पडली. प्रमाणलेखनाची गरज सामान्य लेखक, विद्यार्थी आणि शासकीय यंत्रणेला समजावी म्हणून त्यांनी सातत्याने लेखन केले. ‘मराठी शब्दलेखन कोश’ हे त्यांचे महत्त्वाचे कार्य. 2007 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आणि नंतर सुधारित आवृत्ती निघालेल्या या कोशाने शुद्धलेखनाच्या अनेक प्रश्नांना प्रमाणभूत आधार दिला.
यास्मिन शेख यांचा प्रमाणभाषेचा आग्रह काहींना जुन्या शुद्धतावादाचा वाटू शकतो. भाषा बदलते, बोली भाषांतून समृद्ध होते, परभाषांतील शब्द स्वीकारते आणि नव्या पिढीबरोबर नवे रूप धारण करते, हे वास्तव आहेच; परंतु यास्मिन यांचा मुद्दा बदलाला विरोध करण्याचा नव्हता. बोलण्यातील स्वातंत्र्य आणि औपचारिक लेखनातील शिस्त यांत फरक असला पाहिजे, ही त्यांची धारणा होती. बोली कोणतीही असो, सार्वजनिक आणि औपचारिक लेखनाला प्रमाणाची चौकट आवश्यक आहे, असे त्या ठामपणे सांगत.
आज मराठी समोरचा प्रश्न केवळ इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाचा नाही. हिंदी-मराठीची नकळत होणारी सरमिसळ, समाजमाध्यमांवरील बेफिकीर लेखन, उच्चाराप्रमाणे शब्द लिहिण्याची सवय आणि कमी होत चाललेली भाषिक काटेकोरता या सगळ्यामुळे शब्दांचे मूळ रूप झपाट्याने बदलते आहे. भाषा प्रवाही असावी; पण प्रवाहाला पात्रच नसेल तर तो पसरतो, ही जाणीव यास्मिन शेख यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी होती. म्हणूनच प्रमाणभाषा जपण्याची त्यांची भूमिका आज अधिकच समकालीन वाटते.
झोप येत नसे तेव्हा त्या मात्रा, अनुस्वार आणि शब्दांच्या अचूक रूपांत स्वतःला गुंतवून घेत. शंभरी ओलांडल्यानंतरही छापील मजकुरातील चूक त्यांच्या नजरेतून सुटत नसे. अखेरपर्यंत त्या वाचत, हाताने लिहीत आणि शुद्धलेखनातील चुका शोधत असत. भारतातूनच नव्हे, परदेशातूनही व्याकरणासंबंधी येणार्या प्रश्नांना त्या दूरध्वनीवर उत्तरे देत.
इतकी उत्तुंग आणि मौलिक कारकीर्द असूनही त्या यत्किंचितही दुराभिमानी नव्हत्या. वाचता येते, लिहिता येते, काम करता येते आणि स्वतंत्रपणे जगता येते, याचे समाधान त्या सदोदित व्यक्त करत. यातच त्यांच्या जगण्याचे व्याकरण दडले होते. भाषाशास्त्राच्या विश्वातील अनेकांसाठी, त्या परंपरा आणि आधुनिकता यांना जोडणारा एक दुवा होत्या. त्यांच्या शिष्यांमध्ये पुढे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी झालेल्यांची संख्या मोठी होती. ‘त्यांची प्रगती हीच माझी खरी मिळकत,’ असे त्या म्हणत.
यास्मिन शेख (Yasmin Shaikh) यांच्या आयुष्यातील एक प्रसंग आपल्या समाजाच्या भाषेकडे पाहण्याच्या दृष्टीवर भाष्य करणारा आहे. 2011 च्या जनगणनेवेळी त्यांच्या घरी आलेल्या कर्मचार्याने नाव पाहिले आणि मातृभाषेच्या रकान्यात परस्पर ‘उर्दू’ लिहिले. शेख यांनी त्याला थांबवून सांगितले, ‘माझी मातृभाषा मराठी आहे.’ नावावरून भाषा आणि धर्म ठरविण्याच्या सवयीशी त्यांची अशी गाठ आयुष्यभर पडत राहिली. पण त्यामुळे त्या व्यथित झाल्या नाहीत.
उलट ‘भाषेला धर्म नसतो’ हा त्यांचा विश्वास अधिक पक्का होत गेला. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसते. ती समाजाची स्मृती, संस्कृतीची खूण आणि विचार करण्याची पद्धत असते. म्हणून तिचे व्याकरण जपणे म्हणजे शब्दांवर पोलिसी पहारा ठेवणे नव्हे; त्या स्मृतीची सुसंगती राखणे होय. यास्मिन शेख यांनी आयुष्यभर नेमके हेच केले.
प्रत्येक शब्द योग्य जागी, योग्य रूपात आणि योग्य अर्थाने यावा यासाठी आयुष्य वेचणार्या यास्मिन देहरूपाने आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी त्यांचा कार्यरूपी वटवृक्ष मराठी भाषेला सदैव सावली देत राहील. या व्याकरण तपस्विनीला भावपूर्ण श्रद्धांजली!






