पुणे -करोनाकाळात नाटकं, चित्रपट व मालिकांना मोठा फटका बसला असून, अनेक कलावंत जगण्यासाठी धडपडत आहेत. राज्य सरकारने पडद्यामागील कलाकारांचा विचार करून मालिका व चित्रपटांच्या चित्रीकरणास परवानगी द्यावी, अशी मागणी अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे यांनी केली.
क्रिएटिव्ह फाउंडेशन व मुकुलमाधव फाउंडेशनच्या वतीने 100 कलावंतांना मदतीचा हात म्हणून किराणा माल देण्यात आला. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेते रमेश परदेशी, शिक्षण समिती अध्यक्ष व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, यास्मिन शेख, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त प्रतीक खर्डेकर, कल्याणी खर्डेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी गीतकार व शांताबाई या गाण्यामुळे लोकप्रिय झालेले कलावंत संजय लोंढे यांना रवीकिरण देसाई व ऋतुजा देसाई यांनी 5000 रुपयांचा धनादेश दिला. तसेच त्यांना एक महिन्याचे रेशनही देण्यात आले.
करोनाकाळात नाटकं, चित्रपट व मालिकांना मोठा फटका बसला असून, अनेक कलावंत जगण्यासाठी धडपडत आहेत. अशा सर्वांच्याप्रती कर्तव्य म्हणून दोन्ही फाउंडेशनने हे मदतकार्य आरंभिले आहे. जेथे कमी तेथे आम्ही हे आमचे ब्रीद आहे. मुकुलमाधव फाउंडेशनने आतापर्यंत 80,000 गरजूंना शिधा वाटप केला असून, यापुढेही हे कार्य सुरू राहील, अशी माहिती खर्डेकर यांनी दिली.