अग्रलेख : आजारी समाज
महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि सांस्कृतिक परंपरेला काळिमा फासणारी आणखी एक अत्यंत संतापजनक, तितकीच सुन्न करणारी घटना जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी (Junnar Pimpalwandi Case) गावात घडली.

Junnar Pimpalwandi Case : महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि सांस्कृतिक परंपरेला काळिमा फासणारी आणखी एक अत्यंत संतापजनक, तितकीच सुन्न करणारी घटना जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी (Junnar Pimpalwandi Case) गावात घडली. अवघ्या दहा वर्षांच्या निष्पाप, आजारी बालिकेवर अत्यंत अमानुषपणे अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला.
पेरू खाण्याचे आमिष दाखवून एका चिमुकलीचा घात केला जातो आणि गुन्ह्यानंतर तो नराधम पोलिसांसोबत तिच्या शोधमोहिमेत सहभागीही होतो हे अत्यंत घृणास्पद, चीड आणणारे आणि संपूर्ण समाजच आजारी असल्याचे दर्शवणारे लक्षण आहे.
एकीकडे आपण प्रगतीची शिखरे पादाक्रांत करण्याचे दावे करतो, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ तसेच ‘लडकी हूँ लढ सकती हूँ’ या सारख्या घोषणा देतो, मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, मुलींना समाजात (Junnar Pimpalwandi Case) वावरताना सुरक्षित वाटावे यासाठी हे सगळे करतो आणि अन्यही दक्षता घेतो. हे करत असतानाच दुसरीकडे आपल्याच समाजात मानवतेला कलंक लावणारी आणि पशूलाही लाजवेल अशी हिंस्र, विकृत प्रवृत्ती राजरोसपणे फिरताना दिसते.
पिंपळवंडी येथील घटना ही केवळ एका गावात घडलेली गुन्हेगारी घटना नाही, तर हा आपल्या सामाजिक मानसिकतेचा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दरार्याचा झालेला सपशेल पराभव आहे. गुन्हेगारांच्या मनात कायद्याची, पोलिसांची वा समाजाची कसलीही भीती उरलेली नाही हे वारंवार होणार्या घटनांवरून अधोरेखित होते आहे.
संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कबुली दिली; पण अशा विकृतींचा वेळीच खात्मा करणारी यंत्रणा आपल्याकडे नसेल तर ती कशी विकसित करता येईल यावर काम होणे गरजेचे आहे. पोलिसांकडे बोट दाखवणे प्रत्येक वेळी सुटकेचा मार्ग ठरू शकत नाही. मुळात आरोपी हा काही परग्रहावरून आलेला नसतो. तो याच समाजात वाढलेला व याच समाजाचे अपत्य असते.
मग त्याच्यात अशी इतकी विकृती का निर्माण होते? घरातले संस्कार कमी पडतात की समाजात सगळीकडेच नैतिकतेची भीडभाड न ठेवता एरव्ही जी कृत्ये होत असतात त्यामुळे अशा आरोपींची नजरच मरून जाते आणि त्यांच्या अंगभूत विकृतीला पोषकच वातावरण मिळते, याचाही आता विचार व्हायला हवा. दरवेळी अशी एखादी लांछनास्पद घटना घडली की वर्तमानपत्रांत त्याच्या बातम्या येतात.
त्यावर टीकाटिप्पणी सुरू होते. सर्वसामान्य माणूस आपला रोष व्यक्त करतो, गटांमध्ये चर्चा होऊन संताप व्यक्त केला जातो आणि तत्काळ कारवाईची अपेक्षा केली जाते. टीव्हीवरच्या कार्यक्रमांत ओरडाओरड होते. महिलांच्या हक्कांसाठी लढणार्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या आपली भूमिका पोटतिडकीने मांडतात आणि मग नेहमीप्रमाणेच आश्वासने देत तपास सुरू केला जातो, त्याला गती दिली जाते.
आताही पोलीस प्रशासनाने 15 दिवसांत आरोपपत्र सादर करण्याचे आणि जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे आश्वासन दिले आहे. लोकप्रतिनिधी आणि संतप्त ग्रामस्थांनी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या मागण्या योग्यच आहेत, किंबहुना अशा राक्षसी कृत्याला फाशीशिवाय दुसरी कोणती शिक्षा असूच शकत नाही. पण, हा न्याय पुन्हा केवळ त्या एका घटनेपुरताच मर्यादित असेल.
नसरापूरच्या घटनेत पोलिसांनी आणि न्यायपालिकेने जी तत्परता आणि कणखरपणा दाखवला त्याकरता त्यांचे अभिनंदन केले गेले, तसेच आताही होईल; पण आता त्यापुढे जाऊन असा विचार करण्याची गरज आहे की या घटना मुळात होऊच नयेत याकरता स्थानिक स्तरावर काही करता येऊ शकते का? कायदे आहेत, तरतुदी कठोर केल्या गेल्या आहेत.
जनमानासातील रोष पाहून आणि एकूणच एक माणूस म्हणून पोलीसही अशा घटना घडल्या की संवेदनशीलपणे ते सगळे हाताळत असतात. ते कोणी कौतुकाची थाप देईल या अपेक्षेने न करता त्यांना घटनेची मनस्वी चीड आली असल्यामुळे तपास भक्कम करत असतात. वकील मंडळीही त्यांचे काम चोखपणे बजावतात हे आपण नसरापूरच्या घटनेत पाहिले. मुद्दा आहे या घटना रोखण्याचा किंवा अशा घटनांच्या मालिकांची साखळी तोडण्याचा. पीडित बालिकेच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले, एका कुटुंबाचा आनंद कायमचा हिरावला गेला.
अगोदरही अशी कितीतरी कुटुंबे होरपळली आहेत. भविष्यात तसे होऊ नये याची जबाबदारी आता उचलावी लागेल. बलात्काराची आणि बालकांवरील अत्याचाराची ही विकृती केवळ शारीरिक वासनेचा विषय उरलेली नाही. हा निष्पापांना चिरडण्याचा अमानुष मार्ग बनला आहे. कपडे, वय किंवा वेळ याने गुन्हेगाराची मानसिकता बदलत नाही, तर स्त्रीला किंवा बालकाला केवळ एक उपभोग्य वस्तू मानण्याच्या सडक्या मानसिकतेतून हे घडते.
इंटरनेटवरील पॉर्नोग्राफीचा बेसुमार मारा, वाढती नशाखोरी आणि कौटुंबिक मूल्यांचा र्हास यामुळे ही विकृत प्रवृत्ती अधिक हिंस्र होत चालली आहे. गृहखात्याने आणि पोलीस प्रशासनाने आता आरोपीला फाशीच्या सुळावर चढवण्यासाठी शक्य ते सगळे केलेच पाहिजे. जर आपण आपल्या घरातील 10 वर्षांच्या लेकीला सुरक्षित ठेवू शकत नसू, तर आपल्या तथाकथित प्रगतीला, संस्कृतीला आणि डिजिटल युगाच्या बातांना काहीही अर्थ उरत नाही.
आता केवळ शोक व्यक्त करून वा समाजमाध्यमांवर मेसेज फिरवून भागणार नाही; तर या विकृतीला मुळापासून (Junnar Pimpalwandi Case) उपटून टाकावे लागेल. संस्काराची बीजे पुन्हा पेरावी लागतील. शालेय शिक्षण, सामाजिक कार्यक्रम अगदी नाटक-चित्रपटांसारख्या मनोरजंनपर कार्यक्रमांच्या माध्यमातूनही हा संस्कार येणार्या पिढ्यांवर बिंबवावा लागेल. तरच मुली समाजात सुरक्षित राहू शकतील.






