मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर ‘वंदे साधारण’ची चाचणी; चेन्नईच्या फॅक्टरीत तयार झालेली ट्रेन पुणेमार्गे मुंबईत दाखल

पुणे – वंदे भारत या अत्याधुनिक ट्रेनपाठोपाठ त्याच आवृत्तीतील पण, नॉन एसी “वंदे साधारण’ ट्रेनची लवकरच चाचणी सुरू केली जाणार आहे. ही ट्रेन चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून (आयसीएफ) येथून मुंबईत दाखल झाली आहे. मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर ही ट्रेन लवकरच धावणार आहे.
“वंदे साधारण’ ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेली सुपरफास्ट नॉन एसी एक्स्प्रेस असेल. फेब्रुवारी 2019 मध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यापासून उच्च आणि मध्यमवर्गीय प्रवाशांच्या पसंतीस उतरली. सामान्य प्रवाशांसाठी देखील त्याच दर्जाच्या सोयी आणि सुविधांसह कमी किमतीत प्रवास करण्यासाठी वंदे साधारण एक्स्प्रेस बनवण्यात आली आहे. या एक्स्प्रेसमध्ये 12 स्लीपर नॉन एसी कोच, आठ जनरल कोच, आणि दोन इतर कोच असतील. “पुश-पुल’ टेक्नॉलॉजी असलेली दोन इंजिन्स पुढे आणि मागे कार्यरत असतील.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार ताशी 130 च्या वेगाने ही ट्रेन धावेल. या ट्रेनमध्ये “वंदे भारत’ प्रमाणेच अनेक नवीन आणि अद्ययावत सुविधा असतील. या गाडीला केशरी आणि करडा (ग्रे) रंग देण्यात आलेला आहे. सध्या तरी ही गाडी मुंबईमध्ये कसारा घाटात वेगवेगळे परीक्षण करण्यासाठी आणण्यात आलेली आहे. या परिसरांमध्ये ही ट्रेन उत्तीर्ण झाली, की तिचा पुढील प्रवास सुरू होणार आहे.
या असतील सुविधा…
- अत्याधुनिक बायो व्हॅक्युम स्वच्छतागृह
- प्रवासी सूचना प्रणाली
- प्रत्येक सीटलगत मोबाइल चार्जिंग पॉइंट
- प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही यंत्रणा




