तळजाई वन उद्यानात NSS स्वयंसेवकांचा वृक्षारोपण उपक्रम: पर्यावरण रक्षणाचा संदेश

पुणे – भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवकांनी गुरुवारी तळजाई वन उद्यानात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा प्रेरणादायी संदेश दिला. या उपक्रमात ४० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला असून, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि पर्यावरण जागरूकता रुजवण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे. संस्थेचे प्राचार्य डॉ. ऋषिकेश देशमुख आणि उपप्राचार्य प्रा. अमित पाटील यांच्या प्रोत्साहनाने हा उपक्रम यशस्वी झाला.
प्रा. विद्या खोबरे, प्रा. जागृती कडू, प्रा. तानाजी कणसे यांनी समन्वयक म्हणून मार्गदर्शन केले, तर प्रा. उमेश सैंदाणे यांचे विशेष सहकार्य लाभले. पर्यावरण तज्ज्ञ अजय सर यांनी जागतिक तापमानवाढ, समुद्रपातळी वाढ, ओझोन थराचे नुकसान, वनोंत्पाटन आणि वन्यजीवांवर होणारा परिणाम यांबाबत सविस्तर माहिती दिली. पर्यावरणाचा समतोल राखणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या उपक्रमात स्वयंसेवकांनी विविध प्रजातींची झाडे लावून त्यांच्या संवर्धनाची शपथ घेतली. या अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची जाणीव बळकट झाली असून, भविष्यात ठोस पावले उचलण्याची प्रेरणा मिळाली. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. तळजाई वन उद्यानातील हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणारा ठरला असून, अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीला निसर्गाशी जोडण्यास मदत होत आहे.





