Illegal Tree Cutting : वाटसरूंची हरपली सावली! कराडमध्ये वृक्षतोडीचा प्रकार उघड; अधिकार्यांचे दुर्लक्ष की संगनमत?
Illegal Tree Cutting : रस्ता रुंदीकरणाचा फक्त बहाणा, प्रत्यक्षात मात्र वृक्षतोड माफियांचे राज्य; तक्रारी करूनही वनविभाग आणि प्रशासन ढिम्म.

Illegal Tree Cutting – कराड- मसूर रस्त्यालगतच्या महाकाय व जुन्या वृक्षांची वेळोवेळी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर तोड सुरु असून येत्या काही दिवसांत रस्त्याच्या कडेला हिरवळच नाहीशी होण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून हे वृक्ष वाटसरूंना सावली देत, वाढते तापमान नियंत्रित ठेवत तसेच पर्यावरण संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होते.
मात्र, सध्या काही ठिकाणी रात्रीच्या वेळी किंवा सुट्टीच्या दिवशी ही तोड गुपचूपपणे केली जात असल्याचे समोर येत आहे. शासनाकडून राज्यभर कोट्यवधींच्या निधीतून वृक्षारोपण मोहिमा राबवल्या जात असताना दुसरीकडे अशा प्रकारची बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि जमिनींच्या वाढलेल्या किमतीमुळे रस्त्यालगतच्या जमिनींना मोठी मागणी आहे. परिणामी जमीन व्यवहार सुलभ करण्यासाठी अडथळा ठरणारे वृक्ष हटवले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. वृक्षतोडीमुळे केवळ सावलीच नाही तर मृद्संवर्धन, जलसंधारण आणि हवेची गुणवत्ता यांवरही परिणाम होत आहे.
तापमानवाढ, धुळीचे प्रमाण वाढणे, पक्षी व लहान प्राण्यांचे निवासस्थान नष्ट होणे असे अनेक दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. अशा प्रकारची अनियंत्रित वृक्षतोड दीर्घकालीन पर्यावरणीय संकटाला आमंत्रण देऊ शकते, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.
तसेच ज्या ठिकाणी वृक्षतोड झाली आहे तेथे तातडीने वृक्षलागवड करून हरितपट्टा पुनर्संचयित करण्याचीही मागणी होत आहे. प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत तर कराड परिसरातील रस्ते लवकरच वृक्षविहीन होण्याचा धोका निर्माण झाला असून याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
रस्ता रुंदीकरणाचा बहाणा…
वृक्षतोडीसाठी अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण, वाहतुकीस अडथळा किंवा सुरक्षेचे कारण पुढे केले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अधिकार्यांना हाताशी धरून झाडे तोडली जात असल्याचे दिसून येते. संबंधित विभागाकडून परवानगी, पर्यावरणीय मंजुरी किंवा पर्यायी वृक्षलागवडीची अट पूर्ण केली जात नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
कराड- मसूर मार्ग तापलेला
विशेषतः कराड-मसूर मार्गावर गेल्या काही वर्षात हजारोंच्या पटीत असणारी वृक्षसंख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. पूर्वी या मार्गावर दाट सावली देणारी वृक्षरांग होती. मात्र, आता अनेक ठिकाणी मोकळा, उन्हाने तापलेला रस्ता दिसू लागला आहे. यामुळे प्रवाशांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत असून स्थानिक जैवविविधतेवरही परिणाम होत आही.
अधिकार्यांचे दुर्लक्ष की संगनमत?
या बेकायदेशीर वृक्षतोडीकडे संबंधित अधिकार्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. काही ठिकाणी ठेकेदार आणि अधिकार्यांमध्ये संगनमत असल्याची चर्चा असून, चिरीमिरीच्या व्यवहारातूनच ही तोड सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.





