AUS vs SA : हेड-मार्श जोडीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचला इतिहास! साकारली रेकॉर्ड ब्रेक भागीदारी

AUS vs SA Head Marsh record break Partnership : मॅके येथील ग्रेट बॅरियर रीफ एरिनामध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत सर्वात मोठ्या सलामी भागीदारीचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या विक्रम सोलंकी आणि मार्कस ट्रेस्कॉथिक यांच्या नावावर होता.
250 धावांची ऐतिहासिक सलामी भागीदारी-
या सामन्यात हेड आणि मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी 250 धावांची भागीदारी केली, जी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत सर्वात मोठी सलामी भागीदारी ठरली. यापूर्वी 2003 मध्ये इंग्लंडच्या सोलंकी आणि ट्रेस्कॉथिक यांनी द ओव्हल येथे 200 धावांची भागीदारी केली होती, तर 2001 मध्ये भारताच्या सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांनी जोहान्सबर्ग येथे 193 धावांची भागीदारी नोंदवली होती.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत सर्वात मोठ्या सलामी भागीदारी :
- 250- ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया), मॅके, 2025
- 200 – विक्रम सोलंकी आणि मार्कस ट्रेस्कॉथिक (इंग्लंड), द ओव्हल, 2003
- 193 – सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर (भारत), जोहान्सबर्ग, 2001
- 193 – शिवनारायण चंद्रपॉल आणि ख्रिस गेल (वेस्ट इंडीज), जोहान्सबर्ग, 2004
ऑस्ट्रेलियासाठी वनडेत पाचव्यांदा 250+ धावांची भागीदारी –
Travis Head and Mitchell Marsh have added the highest opening partnership in ODIs vs South Africa #TravisHead #MitchellMarsh #SachinTendulkar #SouravGanguly #AUSvSA #AUSvsSA #cricket #SBM pic.twitter.com/W67jbcvt7j
— SBM Cricket (@Sbettingmarkets) August 24, 2025
या भागीदारीसह हेड आणि मार्श यांनी आणखी एक मोठा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी वनडे क्रिकेटमध्ये पाचव्यांदा 250 किंवा त्यापेक्षा जास्त धावांची सलामी भागीदारी केली आहे. ऑस्ट्रेलियासाठी वनडेत सर्वात मोठी सलामी भागीदारी 284 धावांची आहे, जी ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 2017 मध्ये पाकिस्तानविरुद्ध अॅडलेड येथे केली होती. यानंतर 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध मेलबर्न येथे हेड आणि वॉर्नर यांनी 269 धावांची भागीदारी केली होती.
ऑस्ट्रेलियासाठी वनडेत 250+ धावांच्या सलामी भागीदारी:
- 284 – ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर, पाकिस्तानविरुद्ध, अॅडलेड, 2017
- 269 – ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर, इंग्लंडविरुद्ध, मेलबर्न, 2022
- 259 – मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर, पाकिस्तानविरुद्ध, बेंगलुरू, 2022
- 258 – अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर, भारताविरुद्ध, वानखेडे, 2020
- 250 – ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श, साउथ आफ्रिकेविरुद्ध, मॅके, 2025
दोन्ही सलामीवीरांचे शतक –
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांनी शतके झळकावली. ऑस्ट्रेलियाच्या वनडे इतिहासात आठव्यांदा अशी कामगिरी घडली आहे, जेव्हा दोन्ही सलामीवीरांनी एकाच सामन्यात शतके केली. ट्रॅव्हिस हेडने 103 चेंडूंमध्ये 17 चौकार आणि 5 षटकारांसह 142 धावांची खेळी केली, तर मिचेल मार्शने 6 चौकार आणि 5 षटकारांसह 100 धावा केल्या.





