Travels Bus Fire: भोसरीत भीषण अग्निकांड! पत्रा कापताना उडाली ठिणगी अन् ४ ट्रॅव्हल्स बस जळून खाक
Travels Bus Fire: पत्रा कापण्याच्या मशीनमधून उडालेल्या ठिणगीमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती; अग्निशमन दलाच्या ५ गाड्यांनी मिळवले आगीवर नियंत्रण.

Travels Bus Fire- भोसरीतील धावडे वस्ती परिसरातील गवळी पार्किंग येथे उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स बसना बुधवारी (दि. ३०) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत चार ट्रॅव्हल्स बस जळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. एक्सपर्ट बॉडी बिल्डिंग गॅरेज, गवळी पार्किंग, धावडे वस्ती, रोशन गार्डनशेजारी या ठिकाणी बसच्या पत्र्याचे काम सुरू होते.
पत्रा कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनमधून ठिणगी उडाल्याने जवळील ज्वलनशील वस्तूंनी पेट घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत परिसरात उभ्या असलेल्या बसपर्यंत ती पोहोचली. आगीची वर्दी सायंकाळी ७ वाजता मुख्य अग्निशमन केंद्राला मिळाली. माहिती मिळताच भोसरी, मोशी, चिखली, २४ वाडी तसेच मुख्य अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना झाली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी डिलिव्हरी होजच्या सहाय्याने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळी पाहणी केली असता एमएच ३७ टी 9777 पारसमणी ट्रॅव्हल्स, एआर 20 ए 3046 चिंतामणी ट्रॅव्हल्स आणि एआर 06 ए 9742 चिंतामणी ट्रॅव्हल्स या बसचे पूर्णपणे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. आग पूर्णपणे विझवल्यानंतर घटनास्थळी कोणताही धोका नसल्याची खात्री करण्यात आली.
तसेच घटनास्थळी कोणीही जखमी नसल्याचे स्पष्ट झाले. सब ऑफिसर गौतम इंगवले यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाने कार्यवाही पूर्ण केली. प्राथमिक माहितीनुसार पत्रा कापणाऱ्या मशीनमधून उडालेली ठिणगी ही आगीचे कारण असल्याचे समोर आले असून, अधिक तपासानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.





