पावसाळ्यात एसटीने करा फॅमिलीसह पर्यटन! कमी खर्चात आरामदायी प्रवास

पुणे – पावसाला सुरुवात होताच घाटमाथा, धबधबे, गड-किल्ले यासह तीर्थक्षेत्र, अष्टविनायक याठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढते. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना परवडेल असा दरात एसटी महामंडळाने खास पॅकेज टुर्स योजना सुरू केली आहे. त्यामुळे आता पर्यटकांना कमी किमतीत, आरमदायी आणि सुरक्षित प्रवास करत पर्यटनाचा अनुभव घेता येणार आहे.
पावसाळ्यात पुण्यातून ताम्हिणी घाट, लोणावळा, माळशेज घाट, कोकण, भोर, खोपोली, सातारा येथील ठोसेघर, महाबळेश्वर, पाचगणी, यासह अन्य घाटमाथा व धबधबे असलेल्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. तसेच शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर, वाई, मढी, परळी वैजनाथ यांसह अन्य तीर्थक्षेत्र आणि अष्टविनायक देवदर्शनासाठी नागरिक प्रामुख्याने जातात.
यात दोन व्यक्तींपासून कमीत कमी 25 ते 30 च्या ग्रुपने हे पर्यटक जात असतात.
मोठा ग्रुप असेल तर खासगी बस ठरवली जाते. मात्र, अनेकांना खासगी बसचे दर पाहता, पर्यटन किंवा देवदर्शनाचे नियोजन फसते. त्यामुळे पुण्यातून कुठल्याही पर्यटन ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्राला जायचे असेल तर बससेवा उपलब्ध आहे. त्याचा पर्यटकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी विभाग प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




