सोनई, (वार्ताहर)- मुळा नदीच्या परिसरातून खेडले परमानंद, करजगाव, पानेगाव, निंभारी आदी गावांच्या भागातून छोट्या वाहनांद्वारे वाळूची वाहतूक सुरू आहे. मुळा नदीकाठच्या गावात वाळू उचलण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याने वाळूबंदी असताना चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू असल्याने याला कोणाचा छुपा आशीर्वाद आहे, हे सांगण्याची गरज नाही. रात्रीच्या वेळी या वाहनातून वाळूची वाहतूक केली जात असल्याने रस्त्याच्या परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे. ही वाहने रात्रभर सुरू असल्याने त्यांच्या आवाजाने झोप लागत नाही. मोठाली वाहने नसली तरी छोट्या वाहनातून चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे. मुळा नदीकाठच्या गावात ठराविक ठिकाणी डेपो मारून वाळू साठवली जाते. ट्रॅक्टरच्या माध्यमातून इतरत्र पोहोच केली जाते. याला पोलिसांचा व महसूल प्रशासनाचा छुपा आशीर्वाद आहे. शासनाने वाळू वाहतुकीवर अंकुश घालण्याचा प्रयत्न केला तरी छुप्या मार्गाने वाळू वाहतूक सुरूच आहे. काही गावांतून वाळू वाहतुकीला विरोध केला असला तरी त्याला न जुमानता छुप्या पद्धतीने हे सुरू आहे. मुळा नदीकाठ परिसरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी वाळूची साठवणूक केली जात आहे. याला महसूल प्रशासनाचा आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही. मुळा नदीकाठच्या गावात विरोध असतानाही छुप्या पद्धतीने वाळूची वाहतूक सुरू आहे. याला आवर घालण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याकडूनच याला खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी कितीही विरोध केला तरी हे सुरूच राहणार आहे.