Jitendra Dudi : पुणे जिल्ह्यात ‘डुडी मॉडेल’ची क्रांती; बदल्यांत पारदर्शकतेचा नवा अध्याय!

शिरूर, (पुणे) : पुणे जिल्ह्यात महसूल प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच पारदर्शक बदल्यांची क्रांती घडली आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक आणि सहाय्यक महसूल अधिकारी यांच्या बदल्यांची संपूर्ण प्रक्रिया कोणताही आर्थिक व्यवहार, राजकीय हस्तक्षेप किंवा ओळखीच्या वशिल्याशिवाय पूर्ण करण्यात आल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
“डुडी पद्धत”ची देशभर चर्चा!
बदल्यांची ही प्रक्रिया संगणकीकृत प्रणालीद्वारे, पूर्णपणे सेवा ज्येष्ठता, कार्यकाळ, उपलब्ध पदे व अर्जांच्या प्राधान्यानुसार पार पाडण्यात आली. यामध्ये कोणत्याही मध्यस्थाची भूमिका नव्हती. परिणामी, स्थानिक राजकीय हस्तक्षेप आणि नातेसंबंधावर आधारित बदल्यांच्या प्रथेवर पडदा टाकत “डुडी पद्धत” ही नवी कार्यसंस्कृती रुजवण्याची सुरुवात झाली आहे.
सोशल मीडियावर “डुडी पद्धत” हा शब्द सध्या ट्रेंडमध्ये असून, सामान्य कर्मचारी वर्ग, शेतकरी संघटना आणि समाजसेवक या निर्णयाचं मनापासून स्वागत करत आहेत. हे मॉडेल महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांनीही आत्मसात करावं, अशी मागणी होत आहे.
भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची नांदी
या ऐतिहासिक निर्णयामुळे महसूल प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. बदल्यांसाठी लाच देण्याची किंवा राजकीय वशिला लावण्याची गरजच उरलेली नाही, हे समजल्यावर प्रामाणिकपणाला चालना मिळाली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “बदली ही स्थिरतेचा नाही, तर नव्या संधींचा भाग आहे. अधिकारी कार्यक्षमतेने काम करत राहिले, तर कुठलीही भीती न बाळगता प्रशासनात बदल करता येतात.”
एक जिल्हा – एक आदर्श
हा निर्णय केवळ पुणे जिल्ह्यापुरता न राहता, संपूर्ण राज्यात पारदर्शकतेचं नवं उदाहरण बनण्याची शक्यता आहे. बदल्यांची ही नवी पद्धत महाराष्ट्राच्या प्रशासन संस्कृतीत सकारात्मक बदल घडवणारी ठरणार आहे.





