केसनंद येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याची बदली

वाघोली – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केसनंद शाखेचा उद्घाटन सोहळा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला होता; मात्र बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासांमुळे शाखा चर्चेत आली होती. त्यामुळे या बँकेचा कारभार रामभरोसे असल्याची बातमी दैनिक प्रभात ने (दि. २८) रोजी प्रसिद्ध केली होती. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने याची दखल घेत बँकेचे कॅशियर रिकामे यांची बदली करून त्यांच्या जागी दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून नागरिकांकडून प्रभात ने या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल प्रभातचे आभार मानले जात आहेत.
याबाबतचे अधिक माहिती अशी की, दि. 19 ऑगस्ट रोजी एका खातेदाराने शाखेत भरलेले पैसे दोन तास झाले तरीही खातेदारांच्या खात्यावर जमा झाले नसल्याची तक्रार एकाने शाखेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी समीर राजपूत यांच्याकडे केली. त्यानंतर तातडीने पैसे खात्यावर जमा झाले होते. मात्र त्यानंतरही प्रकार थांबला नसून 21 ऑगस्ट रोजी भरलेल्या पैशांच्या बाबतीत कॅशियर विजय रिकामे यांनी पैसे जमा होण्यासाठी एक तास लागेल असे सांगितले होते.
बँकेत कोणतीही गर्दी अथवा कोणतेही सर्वर डाऊन नसताना शाखाप्रमुखांची उत्तरे बँकेचे कर्मचारी देत असल्यामुळे नागरिकांना मात्र बँकेत पैसे भरून पैसे खात्यावर जमा होण्यासाठी वाट पाहावी लागत होती. या प्रकारांना नागरिक त्रस्त झाले होते. बँकेच्या दिरंगाईच्या कारभाराचा फटका यापूर्वी देखील नागरिकांना बसला होता, त्यावेळेस चेक वटवण्यास आठ दिवसांचा कालावधी लागत असल्याच्या प्रकाराचे दैनिक प्रभात ने वृत्त प्रसिद्ध करून ढिसाळ कारभार पुढे आणल्यानंतर शाखाप्रमुखांची बदली करण्यात आली होती. बँकेकडून चांगल्या सुविधा देण्यासाठी बँक प्रशासन कटिबद्ध असल्याचे उदाहरण या बदलीतून दिसून आले असून बँकेने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.





