Pimpri News : शेखर सिंह यांच्या बदलीपूर्वीच्या निविदांची मागितली माहिती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदावरून शेखर सिंह यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या बदलीनंतर चुकीच्या कामांवरून त्यांच्यावर टीका होत आहे. दुसरीकडे काही संस्था-संघटनांकडून त्यांचे कौतुक सोहळेही सुरू आहेत. तसे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने माहिती अधिकारातून शेखर सिंह यांच्या बदलीच्या महिनाभरापूर्वी झालेल्या कामांची व निविदांची माहिती प्रशासनाकडे मागितली आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी महापालिकेच्या लेखा विभागात माहिती अधिकाराअंतर्गंत अर्ज केला आहे. त्यांनी आयुक्त सिंह यांच्या बदलीपूर्व १ महिन्यात मंजूर झालेल्या भांडवली कामे व निविदांची सविस्तर माहिती मिळावी, अशी मागणी केली.
या कालवाधीत काढलेल्या निविदाची यादी, ज्यामध्ये विभागाचे नाव, कामाचे नाव, अंदाजपत्रक रक्कम व मंजुर, या कालावधीत मंजूर झालेल्या सर्व निविदाची सविस्तर माहिती, तातडीने व विशेष आदेशाने मंजूर केलेल्या कामांचा तपशील, १ सप्टेंबर ते ५ आक्टोबरपर्यंतच्या टीडीआर फाईलचा तपशील आदी माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, शेखर सिंह यांच्या बदलीनंतर त्यांच्यावर अनेक कामांवरून टीका झाली आहे. त्यांचा कारभार व कार्यपध्दत चर्चेत आली आहे. तर, चांगले काम केले, म्हणून त्यांचे कौतुकही केले जात आहे. त्यात शरद पवार गटाने ही माहिती मागितल्यामुळे सिंह यांनी घाईगडबडीत घेतलेले काही निर्णय पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.





