“बुलेट ट्रेन करा मात्र त्याआधी मुंबईची….”; सुप्रिया सुळेंची मोदी सरकारकडे मागणी

मुंबई :- बुलेट ट्रेन करा मात्र त्याआधी मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल सुधारा, अशी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे केली आहे. गुरुवारी मुंबईमधील एका कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.
तसेच महाराष्ट्र आणि मुंबईतील अनेक महत्त्वाचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने होत असल्याकडेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी लक्ष वेधले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मोदी सरकारने बुलेट ट्रेन जरूर करावी पण त्याआधी मुंबईतील लोकल ट्रेन सुधारली पाहीजे. बुलेट ट्रेनची मागणी कोणीही करत नाहीत. त्यामुळे मुंबईतील घाटकोपर आणि इतर भागातील लोकल ट्रेन, स्टेशनवरील शौचालये अशा गोष्टी सुधारण्याची गरज आहे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
मुंबई लोकल ही मुंबई शहराची लाईफलाईन मानली जाते. त्यामुळे ती सुधारल्यानंतर बुलेट ट्रेन केली तर त्याला आमचा विरोध नाही असेही यावेळी त्या म्हणाल्या.





